रामनवमीच्या शुभमुहूर्तावर कोल्हापूर–कटिहार स्पेशल समर ट्रेनचा शुभारंभ, खासदार महाडिक यांच्या प्रयत्नांना यश

कोल्हापूर-कटिहार समर स्पेशल ट्रेनला रामनवमीच्या दिवशी हिरवा झेंडा दाखवण्यात आला. प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्यामुळे भविष्यात ही गाडी नियमित करण्याचा विचार आहे.

Published on -

कोल्हापूर- कोल्हापूर ते कटिहार या नव्या समर स्पेशल गाडी क्रमांक ०१०१४ चा शुभारंभ रामनवमीच्या दिवशी करण्यात आला. उद्योजक हरिश जैन यांच्या प्रमुख उपस्थितीत हिरवा झेंडा दाखवून गाडीला रवाना करण्यात आले. या विशेष गाडीने कोल्हापूरकरांसह आसपासच्या भागातील प्रवाशांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण केलं आहे.

प्रवाशांचा प्रतिसाद

कोल्हापूरहून पुणे, भुसावळ, इटारसी, प्रयागराजमार्गे कटिहारकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या लक्षणीय आहे. रविवारी सुटलेल्या या गाडीला १०० टक्के रिझर्व्हेशन मिळाले असून, यामुळे या मार्गावरील प्रवाशांचा प्रचंड प्रतिसाद दिसून आला आहे. समर स्पेशल अंतर्गत येणाऱ्या पुढील तीन गाड्यांचे आरक्षणदेखील पूर्ण भरले आहे.

कामगार आणि भाविकांचा वाढता प्रवास

कोल्हापूर-सांगली परिसरात बिहारकडे जाणाऱ्या कामगारांची संख्या मोठी आहे. तसेच विविध धार्मिक स्थळांना जाणाऱ्या भाविकांचाही प्रवास वाढला आहे. या पार्श्वभूमीवर या गाडीला मिळालेला प्रतिसाद भविष्यात गाडी नियमित करण्याच्या दिशेने एक सकारात्मक पाऊल ठरत आहे.

मागणीला यश

रेल्वे प्रवासी संघटनेमार्फत या मार्गावरील रेल्वेची मागणी सातत्याने केली जात होती. खासदार धनंजय महाडिक यांनी या मागणीचा पाठपुरावा रेल्वे मंत्रालय व मध्य रेल्वेकडे केला. त्यांच्या प्रयत्नांना यश येत, ही गाडी सुरू करण्यात आली. प्रवासी संघटनेने याबद्दल खासदार महाडिक यांचे आभार मानले.

गाडीच्या प्रस्थानावेळी शिवनाथ बियाणी, सुहास गुरव, कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनचे अध्यक्ष बाबासाहेब कोंडेकर, मेहता, अनिल तराळ आदी मान्यवर उपस्थित होते. सर्वांनी या गाडीच्या यशासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या आणि भविष्यात गाडी नियमित होण्याची आशा व्यक्त केली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News