अहिल्यानगर- महायुती सरकारने निवडणुकीआधी शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे जाहीर आश्वासन दिले होते. लाडकी बहिण योजना, शेतकरी कर्जमाफीसारखे वचने मतांसाठी दिली गेली. मात्र, सत्तेत आल्यानंतर सरकारकडून या आश्वासनांची पूर्तता झालेली नाही. अर्थसंकल्पीय अधिवेशनातदेखील सरकारने कर्जमाफीचा उल्लेख न करता शेतकऱ्यांच्या अपेक्षांवर पाणी फेरले.
शेतकऱ्यांकडे सरकारचे दुर्लक्ष
अतिवृष्टी, पीक फेल, आर्थिक मंदी आणि आधीच असलेला कर्जाचा बोजा यामुळे शेतकरी अडचणीत आहे. अशा स्थितीत सरकारने कर्जमाफीबाबत कुठलीही ठोस भूमिका घेतलेली नाही. उलट काही मंत्र्यांकडून ‘शेतकऱ्यांनी स्वतः कर्ज फेडावे’ असे निष्काळजी वक्तव्य ऐकवले जात आहे. यामुळे संतप्त झालेल्या प्रहार संघटनेने आंदोलनाची हाक दिली आहे.

घरासमोर मशाल आंदोलन
प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक बच्चू कडू यांनी जिल्हाप्रमुखांची बैठक घेऊन राज्यभरातील आमदारांच्या घरी जाऊन मशाल पेटवण्याचे आदेश दिले आहेत. या माध्यमातून सरकारला शेतकऱ्यांची व्यथा आणि त्यांचे दुर्लक्षित हक्क आठवावेत, हा यामागील उद्देश आहे. रात्रीच्या वेळी मशाल पेटवून सरकारचा निषेध आणि आमदारांना जबाबदारीची जाणीव करून देण्याचा इशारा यामध्ये दिला जाणार आहे.
जिल्ह्यातील प्रहार कार्यकर्ते सज्ज
अहिल्यानगर जिल्ह्यातील अध्यक्ष विनोदसिंग परदेशी, संघटक तुकाराम शिंगटे, समन्वयक विजय भंडारे, उपाध्यक्ष अविनाश ठाणगे आदींसह सर्व तालुकाप्रमुखांना हे आंदोलन राबवण्याच्या सूचना दिल्या आहेत. यासाठी पोलिस अधीक्षक, जिल्हाधिकारी, व पोलिस निरीक्षकांना निवेदन देऊन आंदोलनाची माहिती देण्यात आली आहे.
शेतकऱ्यांना सहभागी होण्याचे आवाहन
राजकीय मतभेद विसरून सर्व शेतकऱ्यांनी या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन प्रहार जनशक्ती पक्षाकडून करण्यात आले आहे. हा लढा केवळ एका पक्षाचा नसून, शेतकऱ्यांच्या हक्कासाठीचा आहे, असे स्पष्ट करत सर्व आघाडी प्रमुखांनी आंदोलनासाठी सज्ज राहण्याचे आवाहन केले आहे.