बोगस रेशनकार्ड शोधण्यासाठी शोध मोहीम सुरू, हे ११ पुरावे द्यावे लागणार, नाहीतर रेशनकार्ड होणार रद्द!

बोगस रेशनकार्ड शोधण्यासाठी १ एप्रिलपासून एक महिन्याची मोहीम सुरू झाली आहे. वास्तव्याचा पुरावा देणे बंधनकारक असून अकरा प्रकारचे पुरावे ग्राह्य धरले जाणार आहेत. पुरावा न दिल्यास रेशनकार्ड रद्द होणार आहे.

Published on -

अहिल्यानगर- जिल्ह्यात अपात्र रेशनकार्डधारक शोधण्यासाठी १ एप्रिलपासून विशेष मोहीम सुरू झाली आहे. संपूर्ण एक महिना चालणाऱ्या या मोहिमेत बोगस शिधापत्रिका धारकांची छाननी केली जाणार आहे. यामध्ये परदेशी नागरिक, विशेषतः बांगलादेशी घुसखोरांची ओळख पटल्यास त्यांच्या नावावरील कार्डे तात्काळ रद्द करण्यात येणार आहेत.

मोहीम राबविण्याची जबाबदारी दुकानदारांकडे

मोहीम यशस्वीपणे राबविण्यासाठी रेशन दुकानदारांना केंद्रबिंदू ठरवण्यात आले आहे. ग्राहकांना नमुना फॉर्म हे दुकानदार विनामूल्य पुरवतील. फॉर्मसह वर्षभराच्या वास्तव्याचा पुरावा अनिवार्य असून, एकूण ११ प्रकारांतील कोणताही एक अधिकृत दस्तऐवज सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

पुरावा न दिल्यास कार्ड रद्द होणार

वास्तव्याचा पुरावा सादर न केल्यास ग्राहकांना १५ दिवसांची मुदत दिली जाणार आहे. मुदतीत पुरावा न दिल्यास संबंधिताचे रेशनकार्ड रद्द होईल. त्यासाठी हमीपत्रही आवश्यक असून, ते सादर केल्यानंतरच ग्राहकाला पावती दिली जाईल.

‘अ’ आणि ‘ब’ गटात अर्जांचे वर्गीकरण

छाननीदरम्यान सादर करण्यात आलेल्या पुराव्यावर आधारित अर्जांची दोन गटांमध्ये विभागणी होणार आहे. ‘अ’ गटात सर्व कागदपत्रे पूर्ण असलेले अर्ज समाविष्ट होतील आणि त्या ग्राहकांचे रेशनकार्ड पूर्ववत राहील. तर ‘ब’ गटात अपूर्ण माहिती असलेले अर्ज टाकण्यात येतील आणि त्यांच्यावर पुढील कार्यवाही केली जाईल.

लागणारे पुरावे

भाडे करारनामा, निवासस्थानाचे मालकी हक्काचे कागदपत्र, गॅस कनेक्शन बिल, बँक पासबुक, वीज/टेलिफोन/मोबाईल बिल, ड्रायव्हिंग लायसन्स, कार्यालयीन ओळखपत्र, मतदार ओळखपत्र आणि आधार कार्ड यापैकी कोणताही एक पुरावा ग्राह्य धरला जाणार आहे.

जिल्ह्यातील रेशनकार्डधारक

जिल्ह्यात एकूण १० लाख ५९ हजार ७६० रेशनकार्डधारक असून त्यांना लाभ मिळणाऱ्या सदस्यांची संख्या ४१ लाख ७९ हजार ७८६ एवढी आहे. यामध्ये अंत्योदय योजनेअंतर्गत ८७ हजार ०६४ कार्डधारक असून, त्यांना लाभ मिळणाऱ्या नागरिकांची संख्या ३ लाख ८६ हजार ०३४ आहे.

प्राधान्य कुटुंब योजना अंतर्गत ६ लाख ३७ हजार ११४ रेशनकार्डधारक असून, त्यांचे लाभार्थी २५ लाख ६३ हजार ९७१ आहेत. पांढऱ्या कार्डधारकांची संख्या ४७ हजार ६३० असून, त्यांचे लाभार्थी १ लाख ८३ हजार ४१७ आहेत. तर जास्त उत्पन्न गटातील कार्डधारकांची संख्या २ लाख ८७ हजार ८९९ असून, लाभार्थ्यांची संख्या १० लाख ४६ हजार ६६४ आहे.

कारवाईसाठी प्रशासन सज्ज

बोगस कार्डांमुळे खऱ्या गरजूंचा हक्क हिरावला जात असल्याने, ही मोहीम अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक कागदपत्रांसह फॉर्म लवकरात लवकर सादर करावा, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी हेमा बडे यांनी केले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News