पुणे- पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालय सध्या एका वादग्रस्त घटनेमुळे चर्चेत आहे. तनिषा भिसे यांच्या निधनानंतर हे रुग्णालय केंद्रस्थानी आलं आहे. त्यांच्या कुटुंबाकडून १० लाखांची अनामत रक्कम मागितल्यामुळे उपचारास विलंब झाला, अशी माहिती समोर आली. याच पार्श्वभूमीवर या रुग्णालयाला मिळालेली सहा एकर जागा नेमकी कशी मिळाली, याविषयी चित्रसेन खिलारे यांनी सविस्तर माहिती दिली आहे.
खिलारे यांच्या पूर्वजांची जमीन
चित्रसेन खिलारे सांगतात की, “आमच्या पूर्वजांकडे एरंडवणे परिसरात मोठ्या प्रमाणावर जमीन होती. त्याच काळात, म्हणजे सुमारे १९८९ साली, सुप्रसिद्ध गायिका लता मंगेशकर यांनी माझ्या वडिलांकडे – भाऊसाहेब खिलारे यांच्याकडे संपर्क केला. त्यांनी सांगितलं की वडिलांच्या (दीनानाथ मंगेशकर) स्मृतीप्रित्यर्थ पुण्यात एक रुग्णालय उभारायचं आहे. त्यासाठी योग्य जागेची गरज आहे.”
त्या वेळी लता मंगेशकर आणि भाऊसाहेब खिलारे यांच्यात जवळचा स्नेहसंबंध होता. त्यानुसार, पुण्यातल्या एरंडवणे परिसरातील जागा सुचवण्यात आली. त्याकाळात बहुधा शरद पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. लता मंगेशकर यांनी त्यांचीही भेट घेतली आणि या कामासाठी सहकार्याची विनंती केली.

शरद पवारांची मध्यस्थी
त्या काळात पुण्यात यूएलसी (Urban Land Ceiling) कायदा लागू होता. त्यामुळे जमीन हस्तांतर किंवा दान करणे सहज शक्य नव्हतं. तरीही शरद पवार यांनी भाऊसाहेबांना सांगितलं, “तुमच्याकडून याआधी अनेक संस्था, मंदिरं, शाळा यांसाठी जागा दिल्या गेल्या आहेत. जर चांगल्या उद्देशाने रुग्णालय उभारायचं असेल, तर यासाठीही मदत करा.”
भाऊसाहेबांनी त्यावर सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यांनी परिवारासोबत चर्चा करून रुग्णालयासाठी जमीन उपलब्ध करून दिली. त्या वेळी पुण्याच्या पश्चिम भागात – म्हणजे एरंडवणे, कोथरूड, औंध – या परिसरात मोठ्या रुग्णालयांची कमतरता होती. त्यामुळे त्या भागासाठी हे रुग्णालय महत्त्वाचं ठरणार होतं.
जागेबाबत गैरसमज आणि स्पष्टीकरण
सध्या काही सोशल मीडियावर फिरणाऱ्या पोस्टमध्ये ही जागा बाळासाहेब फुलेंची होती, असा दावा केला जातोय. मात्र चित्रसेन खिलारे यांनी याचा स्पष्ट नकार दिला. “बाळासाहेब फुले हे आमच्या वडिलांचे मित्र होते. जागेचा त्यांच्याशी काही संबंध नव्हता,” असं त्यांनी स्पष्ट केलं.
तनिषा भिसे प्रकरणावर प्रतिक्रिया
या संपूर्ण घडामोडीवर बोलताना चित्रसेन खिलारे म्हणाले, “आज या रुग्णालयावर गंभीर आरोप होत आहेत, त्यामुळे अनेक लोक मला विचारतात की ‘तुमची दिलेली जागा असताना हे कसं घडलं?’ याचं उत्तर देताना मन दुखावलेलं आहे. आमचं उद्दिष्ट नेहमी जनहिताचं राहिलं आहे. जर अजूनही समाजासाठी काही काम करता येणार असेल, तर आम्ही ते नक्की करू.”
भाऊसाहेब खिलारे यांचा दानशूरपणा
“माझ्या वडिलांचं तत्वच असं होतं की एका हाताने दिलेलं दुसऱ्या हाताला कळता कामा नये. त्यांनी अनेक ठिकाणी जागा दिली, पण कधीही प्रसिद्धी घेतली नाही. उदाहरण द्यायचं झालं तर म्हात्रे पुलाजवळ असलेलं महादेव मंदिर रस्त्याच्या अडथळ्यात आलं होतं. महापालिकेने जागा मागितली तेव्हा वडिलांनी लगेच परवानगी दिली,” असं चित्रसेन खिलारे यांनी नमूद केलं.
भविष्यात अशा घटना घडू नयेत
चित्रसेन खिलारे यांनी शेवटी स्पष्ट केलं की, “जागा दान दिल्याला आता ३४ वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. मात्र आज जे घडलं, ते अत्यंत दुर्दैवी आहे. चूक कुणाची आहे हे तपासानंतर स्पष्ट होईलच, पण भविष्यात अशा घटना पुन्हा होऊ नयेत हीच आमची अपेक्षा आहे. भिसे कुटुंबावर जे ओढवलं ते मन हेलावून टाकणारं आहे. इतकंच म्हणतो की, रुग्णालयांचा हेतू जर सेवा असेल, तर त्या सेवेला संवेदनशीलता हवी.”