अहिल्यानगर- पुणे-नाशिक महामार्गाला जोडणारा राहाता ते पानोडी (संगमनेर) हा ३६ किलोमीटर लांबीचा नवा काँक्रीट रस्ता साईभक्तांसाठी मोठा दिलासा घेऊन येत आहे. सुमारे १५४ कोटी रुपये खर्चून बनणाऱ्या या रस्त्यामुळे पुण्याहून शिर्डीकडे येणाऱ्या साईभक्तांचे ५० ते ६० किलोमीटर अंतर कमी होणार आहे.
आधुनिक सुविधायुक्त रस्ता
हा रस्ता सात मीटर रुंद असून दोन्ही बाजूंनी १.५ मीटर मुरूमीकरण असेल. त्यामुळे एकूण रुंदी १० मीटर इतकी आहे. केलवड, आश्वी, शिबलापूर या प्रमुख गावांतून जाणाऱ्या रस्त्यावर १० मीटर रुंद काँक्रीट रस्ता, दोन्ही बाजूंस १ मीटरचे पेव्हिंग ब्लॉक आणि १.२ मीटरचे साईड गटार असेल. या तीन गावांमध्ये रस्त्याची एकूण रुंदी १४.५ मीटरपर्यंत जाईल. ऑक्टोबर २०२४ मध्ये सुरू झालेल्या या प्रकल्पाचे काम ३० महिन्यांत पूर्ण होणार आहे.

अतिक्रमणाचा तिढा
या मार्गावर केलवड, दहेगाव, लोहारे, निमगाव जाळी, आश्वी बुद्रुक, आश्वी खुर्द, शिबलापूर, पानोडी यांसारखी गावे येणार आहेत. त्यामुळे केवळ धार्मिकच नव्हे तर स्थानिक नागरिक, शेतकरी व प्रवाशांनाही याचा मोठा लाभ होणार आहे.
मात्र, या मार्गात येणाऱ्या अतिक्रमणांमुळे लहान-मोठ्या व्यावसायिकांमध्ये अस्वस्थतेचे वातावरण पसरले आहे. रस्ता रुंद करताना अनेकांना जागा सोडावी लागणार असल्याने काहीसा विरोध व गोंधळ निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पर्यटन व वाहतुकीसाठी चालना
जिल्ह्यातील तीर्थक्षेत्र पर्यटन विकास आराखड्याचा हा भाग असून, या प्रकल्पामुळे शिर्डीच्या दर्शनासाठी येणाऱ्या लाखो भाविकांना जलद, सुरक्षित आणि थेट मार्ग उपलब्ध होणार आहे. महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा महामंडळाच्या माध्यमातून राबवण्यात येणारा हा प्रकल्प जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जात आहे.
पालकमंत्र्यांकडून आश्वासक भूमिका
जलसंपदा मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी या रस्त्याच्या कामाला गती देत स्थानिक पायाभूत सुविधांच्या विकासाला प्राधान्य दिल्याचे स्पष्ट केले आहे. नागरीक, भाविक आणि शेतकऱ्यांसाठी हा मार्ग अत्यंत उपयुक्त ठरणार आहे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.