Kamda Ekadashi 2025 | सनातन धर्मात एकादशीला विशेष महत्त्व दिले जाते. दर महिन्याच्या शुक्ल आणि कृष्ण पक्षातील एकादशी तिथीला उपवास आणि भगवान विष्णूची पूजा केली जाते. यंदाची पहिली आणि अत्यंत फलदायी मानली जाणारी कामदा एकादशी आज 8 एप्रिल 2025 रोजी आहे. चैत्र शुक्ल पक्षातील ही एकादशी नववर्षातील पहिली एकादशी असून, धार्मिक दृष्टीने तिचे महत्त्व इतर एकादशींपेक्षा अधिक मानले जाते. यामागे कारण असे की, या दिवशी भगवान विष्णूची कृपा प्राप्त होते आणि मागील पापांचे क्षालन होते. तसेच, या दिवशी राशीनुसार विशिष्ट वस्तू दान केल्यास आयुष्यात शुभ फळ मिळते.
शुभ योग-
पंचांगानुसार कामदा एकादशी तिथी 7 एप्रिल रोजी रात्री 8:01 वाजता सुरू झाली असून आज 8 एप्रिल रोजी रात्री 9:12 वाजता समाप्त होईल. पण उदयतिथीनुसार व्रत 8 एप्रिल रोजी पाळले जाणार आहे. विशेष म्हणजे, या दिवशी रवि योग, सर्वार्थ सिद्धी योग आणि लक्ष्मी नारायण योग असे अनेक शुभ योग देखील तयार होत आहेत. हे योग यंदाच्या कामदा एकादशीला अधिक शुभ बनवत आहेत.

या एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूची पूजा, विष्णू सहस्रनामाचे पठण, फळांचा उपवास, भजन-कीर्तन आणि जागरणाचा विशेष कार्यक्रम केला जातो. असे मानले जाते की या दिवशी उपवास करून भक्तीभावाने विष्णूची पूजा केल्यास भूतकाळातील पाप दूर होतात आणि नवीन सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते. पूजेनंतर दान करणे हा एक महत्त्वाचा भाग आहे.
कामदा एकादशीच्या दिवशी राशीनुसार विशिष्ट वस्तू दान केल्यास त्या व्यक्तीला विशेष लाभ होतो. ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक राशीच्या ग्रहांच्या स्थितीला अनुसरून काही वस्तूंचे दान शुभ मानले जाते.
‘या’ वस्तु दान करा-
मेष : या राशीच्या लोकांनी या दिवशी लाल मिठाई, डाळ आणि हंगामी लाल फळांचे दान करावे.
वृषभ : या राशीच्या व्यक्तींनी तांदूळ, गहू, साखर आणि दूध यांचे दान करावे.
मिथुन : या राशीच्या लोकांनी गायीला चारा द्यावा आणि गरजूंना हिरव्या भाज्या वाटाव्यात.
कर्क : या राशीच्या व्यक्तींनी लोणी, लस्सी आणि साखरकांडी यांचे दान करावे.
सिंह : या राशीच्या लोकांनी लाल फळे आणि सरबत वाटावे.
कन्या : या राशीच्या व्यक्तींनी विवाहित महिलांना हिरव्या बांगड्या द्याव्यात.
तूळ : या राशीच्या व्यक्तींनी पांढरे कपडे गरजूंना द्यावेत.
वृश्चिक : या राशीच्या लोकांनी मसूर, लाल मिरची आणि लाल फळांचे दान करावे.
धनु : या राशीच्या लोकांनी केशर मिसळलेले दूध, पिवळी फळे आणि खाद्यपदार्थ वाटावेत.
मकर : या राशीच्या व्यक्तींनी गरिबांना पैसे दान करावेत.
कुंभ : या राशीच्या लोकांनी चप्पल, छत्री आणि काळ्या कपड्यांचे दान करावे.
मीन : या राशीच्या व्यक्तींनी केळी, हरभरा डाळ, बेसन आणि पिवळ्या कपड्यांचे दान करावे.
या एकादशीच्या दिवशी उपवासासोबतच व्रत कथा ऐकणे, पूजा विधी पूर्ण करणे आणि श्रद्धेनुसार दान करणे अत्यंत पुण्यकारक मानले जाते. या दिवशी मन आणि वाणीवर संयम ठेवणे, सात्विक आहार घेणे आणि कोणतीही हिंसा किंवा वाद टाळणे आवश्यक असते.