जोतिबा चैत्र यात्रेचा मुख्य दिवस १२ एप्रिल असून, जोतिबाचे मंदिर सलग ७९ तास भाविकांना दर्शनासाठी खुले राहणार आहे. श्री क्षेत्र जोतिबा डोंगरावर चैत्र यात्रेच्या पार्श्वभूमीवर दि. ११ एप्रिलच्या पहाटे श्री जोतिबा देवाचे मंदिर दरवाजे उघडल्यानंतर ते दि. १४ रोजी रात्री ११ वाजता बंद होणार आहे.
जोतिबा देवाच्या चैत्र यात्रेचा मुख्य दिवस दि. १२ एप्रिल असून, पहाटे ५ वाजता महाभिषेक होणार आहे. दुपारी १२ वाजता सासनकाठी मिरवणुकीस प्रारंभ केला जाणार आहे. सायंकाळी ५.३५ या हस्त नक्षत्रावर श्री जोतिबाचा पालखी सोहळा श्री यमाई मंदिराकडे निघणार आहे

दरम्यान, यात्रेच्या नियोजनाची तयारी अंतिम टप्यात आली असून, तहसीलदार, देवस्थान समिती पोलीस, ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी जोतिबा मंदिराच्या मुख्य मार्गावरील दुकानांची ताटपत्री, छत, थाटीची अतिक्रमणे काढून प्रशस्त मार्ग केला. दर्शन मंडपातील दर्शन रांगेची व्यवस्था अंतिम टप्यात आली आहे. मंदिराची रंगरंगोटी पूर्ण झाली आहे
भेसळयुक्त गुलाल, पेढ्यांची अन्न आणि औषध प्रशासनाकडून तपासणी केली जात आहे. प्लास्टिक पिशवीचा वापर करण्यावर प्रतिबंध केला असून, दंडात्मक कारवाई सुरू करण्यात आली आहे.
नारळ, खोबरे, गुलालाचे ट्रक जोतिबा डोंगरावर येण्यास सुरुवात झाली आहेत, देवस्थान समितीने दुकानगाळे लिलाव पद्धतीने दिले असून, व्यापारी दुकाने उभारण्यात व्यस्त आहेत. पुजारी घर सजावट करून भाविकांना निवासाची सोय करत आहेत. द्रोण, पत्रावळी यांची खरेदी होत आहे
यात्रेसाठी १५० हून अधिक बसेस एसटी स्टँड, पंचगंगा नदीघाटावर थांबे; दर पाच मिनिटांनी होणार फेऱ्या
दख्खनचा राजा जोतिबाची यात्रा शनिवार १२ एप्रिल रोजी आहे. या यात्रेसाठी महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेशातून येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी दि. ११ ते १४ एप्रिल या कालावधीत एसटीकडून जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. यामध्ये कोल्हापूर विभागाकडून १५०, तसेच सांगली, सातारा, सोलापूर व पुणे विभागांमार्फतही जादा बसेस सोडण्यात येणार आहेत.
प्रतिवर्षी भाविकांच्या सोयीसाठी जादा बसेस सोडण्यात येतात. कोल्हापूर, सांगली आणि सातारा विभागांचे अधिकारी, पर्यवेक्षक, वाहतूक नियंत्रक, प्रशासकीय कर्मचारी आणि चालक, वाहक असे कर्मचारी तैनात केले आहेत. कोल्हापूर विभागातील सर्व प्रमुख वसस्थानकांवरून जोतिबा डोंगर अशी थेट बस सेवा उपलब्ध करण्यात आली आहे.
यात्रेसाठी दि. ११ ते १४ एप्रिल या कालावधीत व पुढील चार रविवारी होणाऱ्या पाकाळणी यात्रेसाठी जास्त बस फेन्यांचे नियोजन करण्यात आले आहे, यात्रेसाठी मध्यवर्ती बसस्थानक कोल्हापुर, जोतिबा डोंगर व पंचगंगा घाट या ठिकाणी प्रवाशांच्या सोयीसाठी तात्पुरत्या स्वरूपाचे यात्रा शेड उभारले आहेत. मध्यवर्ती बसस्थानक, पंचगंगा घाट व डोंगरावरून दर ५ मिनिटाला बस फेरीचे नियोजन करण्यात आले आहे.
भाविक दाखल होण्यास प्रारंभ
मंगळवार, दि. ८ एप्रिल रोजी कामदा एकादशीच्या मुहूर्तावर जोतिबा डोंगरावर भाविक दाखल होण्यास प्रारंभ होईल, जोतिबा चैत्र यात्रेसाठी बेळगावची सासनकाठी मंगळवारी जोतिबा मंदिरात दाखल होईल. १२७ किलोमीटर अंतर चालत जोतिबा मंदिरात बेळगावची सासनकाठी दाखल होईल.
तीन दिवस जोतिबा डोंगरावर यांचे वास्तव असते. बेळगावहून बैलगाडीतून निघालेल्या जोतिबा उत्सवमूर्तीचे शुक्रवारी दुपारी १२ वाजता जोतिबा मंदिरात आगमन होईल, सोबत पारंपरिक वाद्यांबरोबर अब्दागिरी, पताका, ढोल-ताशा, मशाल, भगव्या पताका अशा लवाजम्यासह बेळगावची जोतिबा उत्सवमूर्ती मंदिरात दाखल होईल.