अहिल्यानगर : नुकतीच शहरात रामनवमी उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी श्रीराम नवमी मिरवणुकीत मोठ्या आवाजात डीजे सिस्टीम लावून ध्वनी प्रदूषण करणाऱ्या दोन मंडळांचे अध्यक्ष व डीजे मालकांवर कोतवाली पोलिसांनी तर दोन मंडळांच्या अध्यक्ष व डीजे मालकांवर तोफखाना पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.
श्रीराम नवमी जयंती मंडळांनी डीजेचा आवाज मर्यादित ठेवावा, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे उल्लंघन करून ध्वनी प्रदूषण करु नये, याबाबतच्या सुचना पोलिसांनी दिलेल्या असतानाही मिरवणुकी दरम्यान हिंदू राष्ट्र सेना मंडळ व सकल हिंदू समाज मंडळाने पोलीस प्रशासनाने दिलेल्या सूचनेकडे दुर्लक्ष करून मोठ्या आवाजात गाणी लावून आवेशपूर्ण घोषणाबाजी केली.

तसेच सर्वोच्च न्यायालयाने ध्वनी क्षेपकाबाबत घालून दिलेल्या अटी व शर्तीची उल्लंघन करून मोठ्या आवाजात डीजे लावून ध्वनी प्रदूषण केले. त्यामुळे कोतवाली पोलिसांनी मंडळाचे अध्यक्ष शुभम मनोज कर्डिले (रा. शेरकर गल्ली, सर्जेपुरा) व डीजे मालक महेश दत्तात्रय शिंदे (रा. तुषार बेकरी किशकिंदा नगर, पुणे),
सकल हिंदू समाज मंडळाचे अध्यक्ष दिगंबर लक्ष्मण गेंट्याल (रा. सावेडी), डी जे मालक वैभव विठ्ठल बोरकर (रा. लोणी काळभोर, ता. हवेली, जिल्हा पुणे) यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. तसेच तोफखाना पोलिसांनी श्रीराम सेना बोल्हेगाव मंडळाचे अध्यक्ष प्रतीक कांबळे (रा. बोल्हेगाव),
डीजे मालक रितेश राजेश पाटील (रा. सांगली), वास्तव ग्रुप सावेडी मंडळाचे अध्यक्ष दीपक ज्ञानेश्वर नाटकर (रा. कसबे वस्ती, तपोवन रोड), डीजे मालक सुरज जयवंत घारे (रा. घारेवाडी, कराड, सातारा) यांच्याविरुद्ध वेगवेगळ्या गुन्ह्याची नोंद केली.