अहिल्यानगर- डिजिटल माध्यमांच्या उदयामुळे मागे पडलेल्या पोस्ट खात्याला पुन्हा नवसंजीवनी मिळाल्याचे आशादायक चित्र नगर जिल्ह्यात पाहायला मिळत आहे. महाराष्ट्र शासनाच्या ‘मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना’ अंतर्गत हजारो महिलांनी पोस्ट खात्यावर विश्वास दाखवला असून, त्यामार्फत पोस्ट खात्याचे जुने वैभव पुन्हा फुलताना दिसते आहे.
लाडक्या बहिणींचा विश्वास
नगर दक्षिण भागातील तब्बल १ लाख ३० हजार महिलांनी या योजनेत सहभागी होण्यासाठी पोस्ट खात्यात आपले बचत खाते उघडले आहे. हा आकडा केवळ एक आर्थिक व्यवहार नव्हे, तर एक सामाजिक परिवर्तनाचे प्रतीक ठरतो आहे. महिलांच्या सक्षमीकरणासाठी सुरू करण्यात आलेल्या या योजनेने पोस्ट खात्याचा जनतेतील विश्वास पुन्हा जागवला आहे.

पोस्ट खात्यातून १५६ कोटी रुपये
योजना सुरू झाल्यापासून आतापर्यंत या महिलांना ८ हप्त्यांद्वारे एकूण १५६ कोटी रुपयांचे थेट बँकिंगद्वारे लाभ मिळाले आहेत. हे पैसे पोस्ट ऑफिसच्या खात्यांतून जमा होत असल्यामुळे महिला थेट डिजिटल व्यवहारात सहभागी होत आहेत. त्यामुळे ग्रामीण आणि निमशहरी महिलांचा आर्थिक सहभाग वाढण्यास मोठी चालना मिळाली आहे.
महत्त्व वाढले
कधी काळी नगर शहरात शंभरावर असणारे पोस्ट बॉक्स आता केवळ ४० पर्यंत आले आहेत. एकेकाळी प्रेम, स्नेह, दुःख, आनंद यांच्या वहनाचे माध्यम असणारे पत्र आज डिजिटल क्रांतीमुळे लोप पावत होते. मात्र, लाडक्या बहिणींच्या खात्यांमुळे या यंत्रणेला नवजीवन मिळाले आहे. आजही दररोज ४ हजार पत्रांची आवक-जावक नगर शहरात नोंदवली जाते.
महिलांची भूमिका
पोस्ट खात्याचे प्रवर अधीक्षक हेमंत खडकेकर यांनी याबाबत प्रतिक्रिया देताना सांगितले की, “महिलांनी दाखवलेला विश्वास म्हणजे पोस्ट खात्याच्या गरिमा आणि स्थैर्याचे पुनरुज्जीवन आहे.” योजनेच्या माध्यमातून महिलांचे आर्थिक सक्षमीकरण तर होतच आहे, पण त्याचबरोबर सरकारी यंत्रणांवरचा विश्वासही वृद्धिंगत होत आहे.