पाथर्डी- तालुक्यातील श्री क्षेत्र हनुमान टाकळी येथे गेल्या ४१ वर्षांपासून अखंडपणे सुरू असलेल्या नामसंकीर्तन महोत्सवाचा शुभारंभ यंदा श्रीरामनवमीच्या निमित्ताने मोठ्या भक्तिभावाने करण्यात आला. रविवारी पार पडलेल्या या सोहळ्यात देवस्थानचे अध्यक्ष रमेशआप्पा महाराज यांच्या हस्ते धर्मध्वज पूजन करून महोत्सवाला सुरुवात झाली. यावेळी हरिश्चंद्र महाराज दगइखैर यांनी कीर्तनाचा पहिला पुष्प गुंफून भाविकांना आध्यात्मिक ज्ञानसंपदेचा लाभ दिला.
भागीरथीबाबांचा आदर्श
या महोत्सवातील विशेष क्षण ठरला तो फूंदे टाकळी येथील भागीरथीबाबा यांच्या कीर्तनाचा. त्यांनी कीर्तन सुरू करतानाच कीर्तन मानधन घेण्यास स्पष्ट नकार दिला आणि त्याऐवजी अन्नप्रसाद सेवेसाठी ११,००० रुपयांची देणगी देवस्थानास अर्पण केली. भागीरथीबाबांनी आपल्या निरूपणात संत परंपरेतील कीर्तनाचे निःस्वार्थ स्वरूप अधोरेखित करत, “कीर्तन हे सेवेसाठी असते, व्यापारासाठी नाही,” असा स्पष्ट संदेश दिला.

त्यांनी यावेळी संतांच्या अभंग, कवने आणि ग्रंथांचे दाखले देत कीर्तनाचे महत्त्व विशद केले. “मानवाच्या जीवनात अर्धे आयुष्य निद्रेत जातं, काही बालपण व आजारपणात संपतं, त्यामुळे उरलेले क्षणच आपले खरे आयुष्य असते,” असे सांगत, प्रत्येक दिवस सत्कर्मासाठी वापरण्याचे आवाहन त्यांनी केले.
संतांची कीर्तने
महोत्सवात आळंदी येथील आसाराम महाराज बडे यांचे कीर्तन सोमवारी रात्री पार पडले. याशिवाय, सोमेश्वर महाराज गवळी, श्रीनिवास महाराज घुगे, हरिश्चंद्र महाराज बर्डे यांचीही कीर्तने भाविकांना अनुभवता येणार आहेत. यामध्ये विविध संतांचे विचार, अभंग, संतचरित्र यांची रसाळ मांडणी केली जाणार आहे.
महोत्सवाची सांगता
शनिवारी पहाटे हनुमान जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून, त्यानंतर आळंदी देवाची येथील कबीर महाराज लोंढे यांच्या काल्याच्या कीर्तनाने महोत्सवाची सांगता होणार आहे. याबाबतची माहिती देवस्थानचे सचिव सुभाष बर्डे यांनी दिली आहे.