टंचाई निवारण विभागाच्या कर्मचाऱ्यांनाच बसतोय पाणीटंचाईचा फटका …! कर्मचाऱ्यांसह नागरिकांना पिण्यासाठी मिळत नाही पाणी

Published on -

अहिल्यानगर : सध्या उन्हाच्या झळा प्रचंड तीव्र झाल्या आहेत त्यामुळे माणसांसह प्राणी, पशु पक्षी देखील पाण्यासाठी व्याकुळ झाले आहेत. उन्हाळ्यात ग्रामीण भागातील नागरिकांना पाणी टंचाई निर्माण झाली असल्यास त्यांना पाणी पुरवठा करण्यासाठी जिल्ह्यासह तालुक्यातील पंचायत समिती कार्यालयात टंचाई शाखा कार्यान्वित करण्यात आलेली आहे

.त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना थेट जिल्ह्याच्या ठिकाणी येण्याची गरज भासत नाही. शेवगाव तालुक्यात देखील पाण्याची समस्या निर्माण झाली आहे त्यामुळे येथील पंचायत समितीत असलेल्या टंचाई शाखेत सर्वसामान्य नागरिकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. सध्या तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात घरकुलांची व गाय -गोठ्याचीही कामे सुरू आहेत.

या कामानिमित्ताने पंचायत समितीमध्ये तालुक्यातून शेतकरी किंवा लाभार्थ्यांची कामासाठी ये -जा सुरू असते. अनेक वेळा अधिकारी उपस्थित नसल्यावर त्या ठिकाणी थांबून त्यांची वाट पाहावी लागते. त्याच वेळेस आठवण येते ती पाण्याची. परंतू कार्यालयात असलेल्या फ्रिजमध्ये पाणीच नसते. याबाबत अधिकाऱ्यांना विचारल्यास ते म्हणतात या ठिकाणी पाणी नाही.

आम्ही घरून पाण्याची एक बॉटल आणतो. ती बॉटल दिवसभरासाठी पुरेशी असते. मात्र, या ठिकाणी येणारे नागरिक सोबत पाणी घेऊन येत नाहीत. या ठिकाणी पाण्याची सोय नाही, पाणी टंचाई विभागासमोरच फ्रिज उभा केलेला आहे.मात्र पाण्याअभावी तो केवळ शोभेची वस्तू ठरला आहे.

ज्या कार्यालयात नागरिकांच्या समस्या सोडवल्या जातात त्याच कार्यालयात पाण्याची टंचाई दिसून येत आहे तर तालुक्यामधील टंचाई हे कार्यालय कसे दूर करेल, हा मोठा प्रश्न आहे. शेवगाव पंचायत समिती कार्यालयात तालुक्यातून जवळपास कार्यालयीन कामासाठी किमान १०० ते २०० नागरिक येत असतात, त्यामुळे त्यांच्या पाण्याची सोय करणे गरजेचे आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe