Chandra Grahan 2025 |यंदा दोन चंद्रग्रहणं आणि दोन सूर्यग्रहणं होणार आहेत. यातील पहिलं चंद्रग्रहण 14 मार्च रोजी फाल्गुन पौर्णिमेला तर पहिले सूर्यग्रहण 29 मार्च रोजी चैत्र अमावस्येला झालं, पण दोन्ही भारतात दृश्यमान नव्हते आणि त्यामुळे त्याचा सुतक काळही लागू नव्हता.
पण आता रक्षाबंधनानंतर पुन्हा एकदा खगोलीय घटना घडणार आहे. सप्टेंबर महिन्यात वर्षातील दुसरं चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहण होणार आहे. विशेष म्हणजे यावेळी भारतातील लोकांना हे चंद्रग्रहण प्रत्यक्ष पाहता येणार आहे आणि धार्मिक नियमांनुसार त्याचा सुतक काळही वैध मानला जाईल. त्यामुळे हे ग्रहण अधिक महत्त्वाचं ठरतं.

कधी असणार चंद्रग्रहण?
चंद्रग्रहण 7 सप्टेंबर 2025 रोजी होईल आणि भारतीय वेळेनुसार सकाळी 9:57 वाजता सुरू होऊन दुसऱ्या दिवशी म्हणजे 8 सप्टेंबरला दुपारी 12:23 वाजता संपेल. हे ग्रहण भारतासह ऑस्ट्रेलिया, युरोप, न्यूझीलंड, अमेरिका आणि आफ्रिकेतही पाहता येईल. या काळात अनेक धार्मिक विधी, उपवास, दान-धर्माच्या गोष्टींचं पालन केलं जातं.
सूर्यग्रहण कधी?
दुसरं सूर्यग्रहण 21 सप्टेंबर 2025 रोजी होणार असून ते अमावस्येच्या रात्री 11:00 वाजता सुरू होईल आणि पहाटे 4:00 वाजता समाप्त होईल. हे एक आंशिक सूर्यग्रहण असेल, मात्र भारतात ते दिसणार नाही. त्यामुळे त्याचा सुतक काळ भारतात लागू होणार नाही. हे ग्रहण प्रामुख्याने ऑस्ट्रेलिया, अंटार्क्टिका आणि पॅसिफिक महासागराच्या काही भागात पाहता येणार आहे.
ग्रहणांचा खगोलशास्त्रीय आणि धार्मिक दोन्ही प्रकारचा अभ्यास महत्त्वाचा मानला जातो. चंद्रग्रहणाच्या वेळी, सूर्य, पृथ्वी आणि चंद्र एका रेषेत येतात आणि पृथ्वीच्या सावलीत चंद्र लपतो. त्यामुळे चंद्र अंधुक किंवा काळसर दिसतो. ही घटना पूर्ण, आंशिक किंवा उपछाया स्वरूपात घडू शकते. याउलट सूर्यग्रहणाच्या वेळी चंद्र पृथ्वी आणि सूर्याच्या मध्ये येतो आणि सूर्यप्रकाश थेट पृथ्वीवर पोहोचत नाही.
कधी कधी चंद्र पृथ्वीपासून अधिक अंतरावर असल्यामुळे तो सूर्याला पूर्ण झाकू शकत नाही, त्यामुळे आकाशात अग्नीवलयासारखं दृश्य दिसतं, ज्याला कंकणाकृती सूर्यग्रहण म्हणतात. काही वेळा संकरित स्वरूपातही सूर्यग्रहण दिसू शकतं.
आगामी चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहणामुळे धार्मिक श्रद्धाळूंसह खगोलप्रेमींमध्येही मोठी उत्सुकता आहे. भारतात दिसणाऱ्या चंद्रग्रहणामुळे मंदिरं बंद राहतील, उपवास पाळले जातील आणि सुतक काळाचे पालन केलं जाईल.