Ahilyanagar Breaking : संगमनेर साखर कारखाना निवडणूक न लढण्याचा विरोधकांचा निर्णय ! माजी मंत्री थोरातांचा मार्ग मोकळा

Published on -

संगमनेर : संगमनेर सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची निवडणूक न लढविण्याचा निर्णय सर्वानुमते घेतला असल्याची माहीती आ. अमोल खताळ, जेष्ठनेते बापूसाहेब गुळवे आणि वसंतराव गुंजाळ, संतोष रोहोम यांनी एका पत्रकाद्वारे जाहीर केले. संगमनेर सहकारी साखर कारखान्याने जाणीवपूर्वक सभासद मतदारांच्या शेअर्स रक्कम भरून न घेणे, तसेच मयत सभासदांच्या वारसांची नोंद न करणे आणि अकोले तालुक्यातील दोन हजार सभासदांना निवडणुकीत उभे राहाण्याचा अधिकार नसल्याच्या तक्रारी मोठ्या स्वरुपात प्राप्त झाल्याने सहकार चळवळीतील तत्वाची होत असलेली पायमल्ली लक्षात घेवून यंदाची निवडणूक लढविणार नसल्याचे यावेळी सांगण्यात आले.

यासंदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात सांगण्यात आले आहे की, संगमनेर कारखान्याची निवडणूक लढवावी असा आग्रह कार्यकर्त्यांचा होता. त्यासाठी गटांमध्ये बैठका होवून प्राथमिक तयारीही सुरु केली होती. तथापि मतदार यादीमध्ये असलेल्या त्रूटी अतिशय गंभीर आणि सहकारी संस्थाच्या कार्यप्रणालीला हरताळ फासण्यासारख्या असल्याचे निदर्शनास आले आहे.

कारखान्याचे दोन हजार सभासद मयत आहेत. या मयत सभासदांच्या वारशांची कोणतीही नोंद कराखान्याने केलेली नाही. विशेष म्हणजे मयत सभासदांपैकी तीस टक्के सभासद हे आम्हाला मानणारे होते. “सहकारी चळवळीत राजकारण नको” ही आमची भूमिका आहे. मात्र कारखाना ज्यांच्या ताब्यात आहे त्यांनी मतदार यादीबाबत सभासदांच्या मागणीचा कुठेही विचार केला नाही. हे सहकार चळवळी मध्ये अभिप्रेत नसल्याकडे लक्ष वेधले आहे.

मात्र सभासद मतदारांना न्याय मिळवून देण्यासाठी आमचे काम सुरूच राहाणार असून सभासद असलेल्या आमच्या कार्यकर्त्यांना कुठेही व्यक्तिगत त्रास आणि त्यांचे अर्थिक नूकसान होवू नये हीच आमची भूमिका असल्याचे पत्रकात नमूद करण्यात आले विरोधकांकडे निवडणुक लढविण्यासाठी इच्छुक उमेदवारांची संख्या चांगली होती. मात्र उमेदवारांची नावं समोर येवू लागली तसा दबावतंत्राचा आणि प्रलोभन दाखविण्याचे प्रकार सुरू झाले. जे सहकार चळवळीला बदनाम करणारे आहे. मात्र आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अतिशय ताकदीने लढविण्याचा निर्धार करून तालुक्याच्या विकासासाठी कटिबद्ध होण्याचा निर्धार मात्र कार्यकर्त्यांनी केला असल्याचे पत्रकात शेवटी सांगण्यात आले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News