Maharashtra Railway News : पश्चिम महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी उन्हाळी सुट्ट्यांच्या गडबडीत एक अगदीच आनंदाची बातमी समोर येत आहे. खरे तर सध्या उन्हाळी सुट्ट्या सुरू आहेत आणि यामुळे रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. वाढत्या प्रवाशांच्या संख्येमुळे अनेकांना रेल्वेगाडीचे तिकीट मिळत नाहीये.
यामुळे प्रवाशांना इतर पर्यायी मार्गाने प्रवास करावा लागतोय. तर दुसरीकडे रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून उन्हाळी सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर समर स्पेशल ट्रेन चालवल्या जात आहेत. पश्चिम महाराष्ट्रातून देखील रेल्वे प्रशासनाकडून अनेक समर स्पेशल ट्रेन सुरू करण्यात आल्या आहेत.

बंगळुरू-गोरखपूर व म्हैसूर-जोधपूर या समर स्पेशल ट्रेन देखील प्रशासनाकडून सुरू करण्यात आल्या असून यामुळे या मार्गावरील रेल्वे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. परंतु या गाड्यांना पश्चिम महाराष्ट्रातील सांगली रेल्वे स्टेशनवर थांबा मंजूर नव्हता.
यामुळे सांगली वरून या गाड्या धावत असतानाही प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत होता. हीच बाब विचारात घेऊन या दोन्ही गाड्यांना सांगली रेल्वे स्थानकावर थांबा मंजूर झाला पाहिजे अशी मागणी प्रवाशांकडून उपस्थित करण्यात आली होती.
यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून रेल्वे बोर्डाकडे सातत्याने पाठपुरावा देखील सुरू होता. दरम्यान आता लोकप्रतिनिधींचा पाठपुरावा यशस्वी झाला असून स्थानिक नागरिकांच्या मागणीला यश आले आहे.
कारण की या दोन्ही समर स्पेशल ट्रेनला सांगली रेल्वे स्थानकावर थांबा मंजूर करण्याचा मोठा निर्णय रेल्वे बोर्डाकडून घेण्यात आला असल्याची माहिती सांगलीचे आमदार गाडगीळ यांनी दिली आहे.
रेल्वे बोर्डाने काय निर्णय घेतलाय?
आमदार सुधीर गाडगीळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, सांगली रेल्वे स्थानकावरून धावणाऱ्या बंगळुरू-वाराणसी-गोरखपूर व म्हैसूर-भगतकीकोठी (जोधपूर) या उन्हाळी विशेष रेल्वे गाड्यांना सांगली स्टेशनवर थांबा मंजूर करण्याचा मोठा निर्णय रेल्वे बोर्डाकडून नुकताच घेण्यात आला आहे.
खरेतर सांगली हा पश्चिम महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा जिल्हा. या जिल्ह्यातून अयोध्या, वाराणसी, प्रयागराज, माऊ (बौद्ध गया), गोरखपूर व राजस्थान येथे आबू रोड, फालना (श्रीनाथजी), जोधपूर, बंगळुरू, आर्सिकेरी (श्रवणबेळगोळ), दावणगिरी, हुबळीकडे जाणार्या प्रवाशांची संख्या मोठी उल्लेखनीय आहे.
मात्र सांगली रेल्वे स्थानकावरून धावणाऱ्या काही लांब पल्ल्याच्या गाड्यांना या स्थानकावर थांबा मंजूर नव्हता. या गाड्यांमध्ये बंगळुरू-वाराणसी-गोरखपूर व म्हैसूर-भगतकीकोठी (जोधपूर) या उन्हाळी विशेष रेल्वे गाड्यांचा सुद्धा समावेश होता.
मात्र आता या दोन्ही समर स्पेशल ट्रेनला सांगली स्टेशनवर थांबा मंजूर करण्याचा निर्णय घेण्यात आला असून या निर्णयानंतर आता सांगली स्थानकावरून विविध राज्यांसाठी अनेक रेल्वे गाड्या उपलब्ध झाल्या आहेत.
दरम्यान रेल्वे बोर्डाने या महत्त्वाच्या रेल्वे गाड्यांना सांगली स्थानकावर थांबा मंजूर केला असल्याने प्रवाशांनी याचा मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.