अहिल्यानगर- कर्जत-जामखेडच्या राजकारणात पुन्हा एकदा आमदार रोहित पवार आणि विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्यातील राजकीय संघर्ष तीव्र झाला आहे. कर्जत नगरपंचायतीतील सत्ताधारी पवार गटाच्या ११ नगरसेवकांनी बंडखोरी करत मुंबईत शिंदे यांची भेट घेतली.
या भेटीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आमदार रोहित पवारांनी तीन दिवसांच्या शांततेनंतर बुधवारी शिंदे यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले. त्यांनी शिंदे यांच्यावर विधान परिषदेच्या सभापती या घटनात्मक पदाचे अवमूल्यन केल्याचा आरोप करत, “आपल्या पदाची गरिमा राखताल का नाही? राजकीय भूमिका घेऊन पदाचे अवमूल्यन करण्याचा विडा उचलला की काय?” अशी खरमरीत टीका केली.

रोहित पवारांची सोशल मीडियावरून टीका
या घडामोडींची सुरुवात कर्जत नगरपंचायतीतील सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या ८ आणि काँग्रेसच्या ३ नगरसेवकांनी बंडखोरीपासून झाली. या नगरसेवकांनी सत्तेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आणि भाजपच्या नगरसेवकांसोबत सहलीला जाण्याचे ठरवले.
सोमवारी त्यांनी नगराध्यक्षा उषा राऊत यांच्याविरोधात अविश्वास ठराव मांडून नवीन पदाधिकारी निवडीची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. या घटनेनंतर रोहित पवारांनी कोणतेही तात्काळ भाष्य टाळले होते. परंतु, मंगळवारी या नाराज नगरसेवकांनी मुंबईत राम शिंदे यांची भेट घेतल्याने नवीन राजकीय समीकरणांची चर्चा सुरू झाली. यानंतर पवारांनी सोशल मीडियावरून शिंदेंवर टीकेची झोड उठवली.
विधिमंडळाच्या प्रथा, परंपरेला धक्का
रोहित पवारांनी आपल्या टीकेत घटनात्मक पदांच्या महत्त्वावर प्रकाश टाकला. त्यांनी म्हटले की, राज्यपाल, विधानसभा अध्यक्ष आणि विधान परिषदेचे सभापती ही पदे महाराष्ट्रात विशेष मान-सन्मानाची आहेत. आजवर या पदांवरील व्यक्तींनी सक्रिय राजकारणापासून स्वतःला दूर ठेवून या पदांचा सन्मान वाढवला आहे.
मात्र, अलीकडच्या काळात या पदांवरील व्यक्ती राजकीय भूमिका घेत असल्याने त्यांचे अवमूल्यन होत असल्याचा प्रश्न उपस्थित होतो, असे त्यांनी नमूद केले. शिंदे यांनी विधिमंडळाच्या दालनात नगरसेवकांसोबत पत्रकार परिषद घेऊन विधिमंडळाच्या प्रथा, परंपरा आणि संकेतांना धक्का लावल्याचा आरोपही पवारांनी केला.
फोडाफोडीमागचा चेहरा समोर
पवारांनी पुढे म्हटले की, प्रथा, परंपरा, निष्ठा आणि विचार यांची तुलना पैशांशी होऊ शकत नाही. कर्जत-जामखेडने नेहमीच या मूल्यांना प्राधान्य दिले आहे. परंतु, शिंदे यांच्या या कृतीमुळे या मूल्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तरीही, या घटनेतून एक सकारात्मक बाब समोर आली की, कर्जत नगरपंचायतीतील नगरसेवकांच्या फोडाफोडीमागे कोणाचा चेहरा आहे हे स्पष्ट झाले, असे त्यांनी सोशल मीडियावरील पोस्टमध्ये ठासून सांगितले. या टीकेने दोन्ही नेत्यांमधील राजकीय संघर्ष