अहिल्यानगर : जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या चार भिक्षेकऱ्यांचा मृत्यू संशयास्पद असल्याचे सांगत खासदार नीलेश लंके यांनी रूग्णालयातील सीसीटीव्ही फुटेज तसेच उपचार केलेल्या आयपीडी पेपरची मागणी जिल्हा शल्यचिकित्सकांकडे लेखी पत्राद्वारे केली आहे.
भिक्षेकरूंच्या मृत्यूनंतर खा.नीलेश लंके यांनी जिल्हा रूग्णालयात जात रूग्णालय प्रशासनाची झाडाझडती घेत संताप व्यक्त केला होता. जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या चार भिक्षेकरूंचा उपचारादरम्यान मृत्यू झाला ही घटना संशयाच्या भोवऱ्यात असल्याचे खा. लंके यांचे म्हणणे आहे.

या घटनेची निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे अशी मागणी करत खा. लंके यांनी अपघात वॉर्ड नंबर १, बेगर वॉर्ड,भिक्षेकरूंना ठेवण्यात आलेल्या किंवा उपचार केलेली खोली/वॉड मधील सीसीटीव्ही फुटेज, भिक्षेकरूंवर करण्यात आलेल्या उपचाराचा तपशील, आयपीडी पेपर/नोट्स यांची मागणी जिल्हा शल्य चिकित्सकांकडे करण्यात आली आहे.
सीसीटीव्ही फुटेज व उपचारासंदर्भातील माहीती प्राप्त झाल्यानंतर सीसीटीव्हीमध्ये काही संशयास्पद आढळल्यास हा मुद्दा राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच आरोग्य मंत्र्यांच्या निदर्शनास आणून निष्पक्ष चौकशी करून दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करणार असल्याचे खा. लंके यांनी सांगितले.
दरम्यान, खा. नीलेश लंके यांनी जिल्हा रूग्णालयास भेट दिल्यानंतर पत्रकारांशी बोलताना मारहाणीमुळे कैद्यांचा मृत्यू झाला असेल तर या घटनेच्या मुळाशी जावे लागेल असे सांगत हा प्रशासनाने घेतलेले हे बळी असून मयत भिक्षेकरूंचे शवविच्छेदन छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रूग्णालयात करण्याची मागणी केली होती. त्याअनुषंगाने खा. लंके यांनी या माहीतीची जिल्हा शल्यचिकित्सकांकडे मागणी केली आहे.