अहिल्यानगर- जिल्हा रुग्णालयात मृत्यू झालेल्या भिक्षेकऱ्यांच्या मृत्यूमागील कारणे समोर आली आहेत. शवविच्छेदन अहवाल आणि रक्त तपासणीच्या निष्कर्षांनुसार, या भिक्षेकऱ्यांची किडनी आणि यकृत निकामी झाले होते, अशी माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली आहे.
शिर्डी पोलिस, नगर परिषद आणि साई संस्थान यांनी संयुक्त कारवाई करत शिर्डी येथील 49 भिक्षेकऱ्यांना ताब्यात घेऊन श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर येथील भिक्षेकरी स्वीकार केंद्रात दाखल केले होते. यापैकी 10 जणांची प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना 6 एप्रिल रोजी अहिल्यानगर जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले.

यातील चार जणांचा 7 आणि 8 एप्रिल रोजी मृत्यू झाला. या घटनेमुळे जिल्हा रुग्णालय आणि भिक्षेकरी स्वीकार केंद्राच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, टीकेचा सामना करावा लागत आहे.
शवविच्छेदन अहवाल समोर
जिल्हा रुग्णालयाने या मृत्यूंची सखोल चौकशी केली असून, शवविच्छेदन अहवालासह चौकशी अहवाल नाशिक येथील आरोग्य उपसंचालकांना पाठवला आहे. हा अहवाल अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेला नाही, परंतु प्रशासकीय सूत्रांनुसार, भिक्षेकरी रुग्णालयात दाखल झाले तेव्हा त्यांच्या रक्त तपासणीत किडनी आणि यकृत निकामी झाल्याचे आढळले.
त्याचबरोबर त्यांची फुफ्फुसेही कमकुवत झाली होती. शवविच्छेदन अहवालात या बाबींवर पुष्टी मिळाली आहे. याशिवाय, व्हिसेरा (अंतर्गत अवयव) तपासणीसाठी पाठवण्यात आला असून, त्याचा अहवाल प्राप्त झाल्यावर मृत्यूंची नेमकी कारणे अधिक स्पष्ट होतील.
भिकारी व्यसनांच्या आहारी
प्रशासनाच्या मते, शिर्डीतील अनेक भिक्षेकरी व्यसनांच्या आहारी गेले होते. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतल्यानंतर व्यसन पूर्णपणे बंद झाले. यामुळे त्यांचे अन्नसेवन थांबले आणि प्रकृती आणखी खालावली. जिल्हा रुग्णालयाने असा दावा केला आहे की, व्यसन बंद झाल्याने भिक्षेकऱ्यांच्या शरीरावर विपरीत परिणाम झाला, ज्यामुळे त्यांची तब्येत ढासळली.
राज्यातील इतर भिक्षेकऱ्यांची आरोग्य तपासणी केल्यास अनेकजण व्यसनाधीन असल्याचे आढळू शकते, असे प्रशासनाचे मत आहे. मात्र, अशा तपासणीची जबाबदारी कोण घेणार, हा प्रश्न अनुत्तरित आहे.
पुण्याला हलवण्याचा सल्ला
जिल्हा रुग्णालयात दाखल झालेल्या भिक्षेकऱ्यांची प्रकृती आधीच अत्यवस्थ होती. त्यांनी अनेक दिवस अन्नसेवन केले नव्हते आणि त्यांच्यात अल्कोहोल विड्रॉल (दारू न मिळाल्याने उद्भवणारी लक्षणे) दिसून येत होती. यामुळे त्यांना तातडीने पुण्यातील ससून रुग्णालयात हलवण्याचा लेखी सल्ला जिल्हा रुग्णालयाने भिक्षेकरी स्वीकार केंद्राला दिला होता, असे सूत्रांनी सांगितले. तरीही ही प्रक्रिया वेळेत पूर्ण न झाल्याने या मृत्यूंमागील परिस्थितीवर प्रश्न उपस्थित होत आहेत.