अहिल्यानगरकरांनो सावधान! तापमानाने गाठली चाळीशी, पुढील पाच दिवस उन्हाचा तडाखा आणखी वाढणार

अहिल्यानगरचे तापमान सलग तीन दिवस ४० अंशावर राहिले असून पुढील पाच दिवसांत ४१ अंशापर्यंत जाण्याची शक्यता आहे. दुपारी तीव्र 'अल्ट्रा व्हायलेट' किरणांचा मारा जाणवत असून नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन.

Published on -

अहिल्यानगर- शहरात गुरुवारी (10 एप्रिल) सलग तिसऱ्या दिवशी तापमान 40 अंश सेल्सिअसवर स्थिर राहिले. गेल्या वर्षी मे महिन्यात नोंदवले गेलेले 40 अंशांचे तापमान यंदा एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यातच ओलांडले गेले आहे. गुरुवारी दुपारी 3 ते 4 या वेळेत उष्ण वाऱ्यासह उन्हाचा तडाखा तीव्रपणे जाणवला.

या एका तासात अति तीव्र उष्णतेची नोंद हवामान विभागाने केली आहे. अल्ट्रा व्हायलेट किरणांचा स्तर वाढल्याने त्वचेवर विपरीत परिणाम होण्याचा धोका वाढला आहे, विशेषतः दुपारच्या वेळी हा स्तर कमाल पातळीवर होता.

तापमानाने गाठली चाळीशी

एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात ढगाळ वातावरण आणि अवकाळी पावसामुळे तापमान काहीसे कमी झाले होते. 2 एप्रिलला ढगाळ हवामानामुळे तापमान 35 अंशांवर होते, परंतु त्यानंतर पाच अंशांनी वाढ होऊन ते 40 अंशांवर पोहोचले. मंगळवार, बुधवार आणि गुरुवार अशा सलग तीन दिवस शहराचे तापमान 40 अंशांवर कायम राहिले.

मार्चच्या शेवटच्या पंधरवड्यात तापमान 39 अंशांपर्यंत गेले होते, तर गेल्या वर्षी एप्रिलमध्ये तापमान 38 अंशांवर होते. मे महिन्याच्या सुरुवातीला गेल्या वर्षी तापमान 40 अंशांवर पोहोचले होते. यंदा मात्र एप्रिलमध्येच तापमानाने चाळीशी गाठली आहे.

पाच दिवसात तापमान वाढणार

सध्या शहरात गेल्या तीन दिवसांपासून तापमान 40 अंशांवर आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील पाच दिवसांत उष्णता आणखी वाढण्याची शक्यता आहे, ज्यामुळे तापमान 41 अंशांपर्यंत जाऊ शकते.

11 एप्रिलला 39 अंश, 12 एप्रिलला 38 अंश, 13 एप्रिलला 39 अंश, 14 एप्रिलला 40 अंश आणि 15 व 16 एप्रिलला 41 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले जाण्याची शक्यता आहे. या काळात नागरिकांना उष्माघातापासून सावध राहण्याचा आणि पुरेसे पाणी पिण्याचा सल्ला हवामान विभागाने दिला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News