अहिल्यानगर : दुधाच्या दारात झालेली प्रचंड घसरण तर दुसरीकडे पशुखाद्य हिरवा चारा यांचे वाढत असलेले दर.त्यामुळे शेतकऱ्यांना दूध उत्पादन खर्च वगळता हातात काहीच पडत नसल्याने सरकारने अनुदान देण्याची मागणी करण्यात आली होती. त्यावर पंचवीस रुपयांपेक्षा जास्त दरात झालेली घसरण लक्षात घेता प्रथम पाच रुपये व दुसऱ्या टप्प्यात सात रुपये अनुदान देण्याचा शासन निर्णय झाला होता.
त्यास अनुसरून दूध उत्पादकांची माहिती वेबसाईटवर मुदतीत भरली. दोन्ही टप्प्यांतील मिळून १ कोटी ३९ लाख रुपये अनुदान वृध्देश्वर दूध उत्पादक व प्रक्रिया संघाच्या ६५५ दूध उत्पादकांच्या बँकखाती जमा झाले असल्याची माहिती चेअरमन सुरेश पवार व व्हा. चेअरमन लिलावती शिंदे यांनी दिली.

२०२० मध्ये माजी आमदार स्व. राजीव राजळे यांनी या संस्थेची स्थापना केली. २०२५रौप्यमहोत्सवी वर्ष आहे. जिल्हा दूध संघापासून विभक्त झालेल्या नगर दक्षिण जिल्ह्यातील सात संघांपैकी अविरत व यशस्वी कामकाज असलेल्या वृध्देश्वर दूध संघाने कायम उत्पादकांचे सार्वत्रिक हिताची जोपासना केली.
अनुदान रक्कम थेट उत्पादकांचे बँकखाती देण्याचा निर्णय झाल्यानंतर पुरक माहिती शासन वेबसाईटवर भरण्यास अग्रक्रम दिला, त्यामुळे पाच रुपये प्रतीलिटरनुसार दिवाळीपूर्वीच पहिल्या टप्प्याचे ७९ लाख २५ हजार रुपये बँकखाती जमा झाले तर दुसऱ्या टप्प्यांतील सात रुपये प्रतीलिटर अनुदान दि. २ एप्रिल २०२५ रोजी सर्व उत्पादकांच्या बँक खाती जमा झाले.
शेतकऱ्यांना दुभत्या जनावरांना चांगल्या प्रतीचा चारा ,पशुखाद्य द्यावे लागते अन्यथा दूध कमी व गुणवत्तापूर्ण निघत नाही. मात्र यासाठी मोठा खर्च करावा लागतो परंतु दुधाचे दर कमी आल्याने शेतकऱ्यांना खर्च अधिक व उत्पन्न कमी मिळत आहे.