अहिल्यानगर – महात्मा फुलेंनी समाजाला शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. महिलांना सुशिक्षित करण्यासाठी मोठा संघर्ष केला. समाजातील वाईट प्रथा-रुढींविरोधात त्यांनी वारंवार आवाज उठवला. पत्नी सावित्रीबाई फुलेंसोबत मिळून त्यांनी समाजातील महिलांना शिक्षणाचा अधिकार मिळवून देण्यासाठी लढा दिला.
त्यांच्या या मोठ्या संघर्षामुळे आज कोट्यवधी महिला शिकून स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या आहेत. त्यांचे कार्य सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी व सर्वांसाठी आदर्श असल्याचे प्रतिपादन आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी केले

महानगरपालिकेच्या वतीने महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार करून अभिवादन करण्यात आले. आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे म्हणाले की, महात्मा ज्योतिराव फुले एक समाजसुधारक, विचारवंत आणि लेखक होते. त्यांनी आपले जीवन शोषितांच्या शिक्षणासाठी तसेच अस्पृश्यता आणि जातिव्यवस्थेच्या निर्मूलनासाठी समर्पित केले,
असे त्यांनी सांगितले. तसेच, महानगरपालिकेच्या वतीने माळीवाडा येथे महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात येणार आहे. त्याची प्रक्रिया सुरू आहे. लवकरच याचे काम सुरू होईल, असेही त्यांनी सांगितले.