Vande Bharat Sleeper Train : वंदे भारत एक्सप्रेसच्या अभूतपूर्व यशानंतर आता देशात वंदे भारत स्लीपर ट्रेन सुद्धा धावणार आहे. नुकत्याच काही महिन्यांपूर्वी देशात वंदे भारत मेट्रोचे संचालन सुरू झालेले आहे. आता वंदे भारत स्लीपर ट्रेन देखील रुळावर धावेल आणि यामुळे रेल्वे प्रवाशांचा प्रवास वेगवान होणार आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की सध्या जी वंदे भारत एक्सप्रेस सुरू आहे ती चेअर कार प्रकारातील आहे.
म्हणजे या गाडीमध्ये फक्त बसण्याची व्यवस्था आहे. पण जी वंदे भारत स्लीपर ट्रेन असेल ती शयन प्रकारातील असेल ज्यात झोपून प्रवास करता येणे शक्य आहे. दरम्यान आता याच नव्या वंदे भारत स्लीपर ट्रेनच्या बाबत नवीन अपडेट हाती आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जुलै 2025 पासून टाटानगर ते वाराणसीदरम्यान वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू होण्याची शक्यता आहे. महत्त्वाची बाब अशी की या अनुषंगाने टाटानगर स्थानकावर भरघोस पायाभूत सुविधा उभारण्यात येत आहेत.
या मार्गावर वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करता यावी यासाठी रेल्वे बोर्ड कडून वॉशिंग लाईन क्र. 3 वर उच्चदाब वीज सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे, जी कोचेसच्या स्वच्छता व देखभालीसाठी वापरली जाईल. एवढेच नाही तर जीआय पाइप्स बसवण्याचे कामही अगदीच युद्ध पातळीवर सुरू झाले आहे.
या सर्व घडामोडी पाहता या मार्गावर आता वंदे भारत स्लीपर ट्रेनच सुरू होणार असा दावा आता होऊ लागला आहे. रेल्वे बोर्डाने सप्टेंबर 2024 मध्ये या 600 किलोमीटर लांबीच्या टाटानगर ते वाराणसी मार्गांवर स्लीपर वंदे भारत सेवेची योजना आखली होती.
मात्र आता लवकरच या मार्गावर वंदे भारत स्लीपर ट्रेन धावणार असून या पार्श्वभूमीवर आवश्यक पूर्वतयारी जवळपास अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. लवकरच आता अपग्रेडेड वॉशिंग लाईन वर ट्रायल रन सुद्धा सुरू होणार आहे. दरम्यान, आधी वॉशिंग लाईन क्र.1 वर ऑगस्ट 2024 मध्ये अशीच सुविधा उभारण्यात आली होती.
सध्या टाटानगरहून पटना, बर्हमपूर आणि रांची-राउरकेला-हावडा मार्गांवर वंदे भारत सेवा सुरू आहे. दरम्यान टाटानगर – वाराणसी स्लीपर वंदे भारत ट्रेनची सेवा रात्री सुरू होण्याची शक्यता आहे. शिवाय, लोको कॉलनीत वंदे भारतसाठी वेगळा “सिक लाईन” तयार होणार असून त्यासाठीचा प्रस्ताव देखील मुख्यालयाकडे पाठवण्यात आला आहे.
नक्कीच, टाटानगर ते वाराणसी वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू झाली तर यामुळे या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळणार असून त्यांचा प्रवास अधिक सुरक्षित आणि आरामदायी तसेच वेगवान होणार आहे. आगामी काळात आपल्या महाराष्ट्राला सुद्धा अशा टाइपच्या स्लीपर ट्रेनची भेट मिळणार आहे. आगामी काळात पुणे, मुंबई, नागपूर अशा महत्त्वाच्या शहरांना या गाडीची भेट मिळू शकते.