कन्या राशीची व्यक्ती ही संयमी, शिस्तप्रिय आणि विचारपूर्वक जगणारी असते. ही व्यक्ती पटकन कुणाशी जुळत नाही, पण एकदा कुणाशी नातं जोडलं की त्यात संपूर्ण निष्ठा असते. ती मैत्रीत आणि प्रेमात खोल गुंतते, पण स्वतःहून कधी पुढाकार घेत नाही. तिच्या आयुष्यातील नाती ही तिच्या मूल्यांवर आधारित असतात – स्थैर्य, संयम, आदर आणि जबाबदारी.
मेष राशीसोबत –

मेष आणि कन्या यांचं नातं विरोधाभासांनी भरलेलं असतं. मेष राशीची आक्रमक आणि त्वेषयुक्त वृत्ती कन्येला गोंधळात टाकते. मेषचे मंगळ स्वामी आणि कन्येचा बुध परस्पर शत्रू असल्याने विचारांची दिशा वेगळीच असते. मेष जेव्हा वेगाने निर्णय घेतो, तेव्हा कन्या प्रत्येक बाबतीत काळजीपूर्वक विचार करते. त्यामुळे या दोघांमध्ये सुसंवाद साधणं कठीण असतं, आणि नातं बराचसा संघर्षदायक ठरतो.
वृषभ राशीसोबत –
वृषभ आणि कन्या या दोघांचं नातं अतिशय सुसंगत असतं. दोघेही पृथ्वीतत्त्वाचे असल्यामुळे त्यांचं विचारविश्व, जीवनपद्धती आणि व्यवहारातले दृष्टिकोन बऱ्यापैकी जुळणारे असतात. वृषभ व्यक्ती कन्येच्या संयमात रमते आणि तिच्या विचारांना स्थैर्य देते. मात्र वृषभाची प्रेम व्यक्त करण्याची शारीरिक पद्धत कधी कधी कन्येला अस्वस्थ करू शकते. योग्य समजुतीने दोघांचं नातं बहरतं.
मिथुन राशीसोबत –
मिथुन आणि कन्या या दोघांच्याही राशीचे स्वामी बुध असल्यामुळे त्यांचं नातं बौद्धिक दृष्टिकोनातून मजबूत असतं. पण मिथुनची सहजता आणि कन्येची काटेकोरता यात सतत ताण जाणवत राहतो. मिथुन व्यक्तीचा खट्याळ स्वभाव कन्येच्या मनाला थोडा गोंधळवणारा वाटतो. मात्र संवाद आणि समजुतीच्या आधारे हे नातं एक वेगळं परिमाण गाठू शकतं.
कर्क राशीसोबत –
कन्या आणि कर्क या दोघांचं नातं हळवं आणि संवेदनशील असतं. कर्क रास भावनांनी भरलेली असते तर कन्या विचारांनी. कधी कधी कर्कच्या खोल भावना कन्येच्या वास्तववादी दृष्टिकोनाशी भिडतात. पण दोघांचं प्रेम हे वेगळ्या स्तरावर पोचतं – जिथे भावना आणि शहाणपण यांचं सुंदर मिश्रण असतं.
सिंह राशीसोबत –
सिंहाचा करिष्मा आणि कन्येचा संयम हे परस्परांना पूरक असतात. सिंह व्यक्तीच्या नेतृत्वगुणांकडे कन्येला आकर्षण असतं, तर कन्येच्या नीटनेटकेपणाने सिंह प्रभावित होतो. काही वेळा सिंहचं वर्चस्व प्रिय वाटत असलं तरी कन्येच्या वैयक्तिक स्पेसवर ते अतिक्रमण करू शकतं. या नात्याला योग्य संतुलन मिळाल्यास ते उत्कट बनू शकतं.
कन्या राशीसोबत –
जेव्हा दोघंही कन्या राशीचे असतात, तेव्हा त्यांचं नातं हे विचारांचे आरसे बनून जातं. दोघांचाही स्वभाव अत्यंत शिस्तबद्ध, विश्लेषणात्मक आणि वास्तववादी असतो. त्यांच्या नात्यात संवादात गोंधळ नसतो – प्रत्येक गोष्ट नीट विचार करूनच होते. थोडीशी बोअर वाटण्याची शक्यता असली तरी परिपक्वतेने हे नातं खूप दृढ होतं.
तूळ राशीसोबत –
तूळ व्यक्ती सौंदर्यप्रिय आणि संतुलन राखणारी असते. ती कन्येच्या संयमाला एक नवं रूप देते. कन्या आणि तूळ या दोघांत मैत्रीचा भाव आणि परस्पर सन्मान असतो. तूळ व्यक्तीच्या खुलेपणामुळे कन्येला थोडा संकोच वाटतो, पण एकमेकांतील संवाद यांना जवळ आणतो. त्यांच्या नात्यात कृत्रिमतेचा अभाव आणि परिपक्वतेचा ठसा असतो.
वृश्चिक राशीसोबत –
वृश्चिक रास अत्यंत गूढ, तीव्र आणि थेट असते. कन्येचं सूक्ष्म निरीक्षण वृश्चिकच्या मनात आदर निर्माण करतं, पण वृश्चिकचं थेट वर्तन आणि जोखमीची तयारी कन्येच्या संयमाला धक्का देते. या नात्यात परस्पर आकर्षण प्रबळ असतं, पण ते टिकवण्यासाठी दोघांनी समजूत दाखवावी लागते.
धनू राशीसोबत –
धनूचा बेफाम उत्साह आणि कन्येचा व्यवस्थितपणा एकमेकांशी भिडतात. धनू व्यक्ती क्षणाचं महत्त्व समजते, तर कन्या दीर्घकालीन विचार करते. यामुळे दोघांमध्ये काही वेळा विसंवाद होतो, पण एकमेकांच्या दृष्टिकोनाला समजून घेतलं, तर हे नातं आनंदी आणि विविधतेने परिपूर्ण ठरू शकतं.
मकर राशीसोबत –
मकर आणि कन्या या दोघांचाही दृष्टिकोन व्यावहारिक असतो. ते हवेत महाल बांधण्याऐवजी जमिनीवर पाय ठेवून स्वप्नं पाहतात. या दोघांचं नातं विश्वास आणि जबाबदारीवर आधारलेलं असतं. त्यांच्यात गोंधळ कमी आणि स्थैर्य जास्त असतं, जे नात्याला दीर्घायुषी बनवतं.
कुंभ राशीसोबत –
कुंभ रास कल्पकतेची आणि विचारस्वातंत्र्याची असते. कन्येच्या नियमबद्धतेशी कुंभचा मुक्त प्रवाह काहीसा विरोध करतो. हे नातं बौद्धिक पातळीवर घडतं, आणि वादही वैचारिक असतात. समोरासमोर बसून चर्चा करणाऱ्या या दोघांना एकमेकांकडून खूप काही शिकता येतं.
मीन राशीसोबत –
मीन व्यक्ती अत्यंत भावनाशील आणि स्वप्नाळू असते. कन्येच्या वास्तववादी जगण्यात ती एक गोड फुंकर घेऊन येते. मीनचं उदार मन कन्येला हळवं करतं, पण मीनचा उधळटपणा आणि भावनिक ओलावा कधी कधी कन्येच्या चौकस मनाला जड जातो. तरीही हे नातं अंतर्मनाला भिडणारं असतं.