पुणे मेट्रो : स्वारगेट ते कात्रज भूमिगत मेट्रो अखेर सुरू ! राज्य सरकारने दिला मोठा निधी

पुण्यातील स्वारगेट-कात्रज मेट्रो मार्गाला अखेर गती मिळाली आहे. बालाजीनगर आणि बिबवेवाडी या दोन नव्या स्थानकांसाठी राज्य सरकारने ६८३ कोटींचा निधी मंजूर केला आहे. महा मेट्रोने पाचही स्थानकांसह नव्या निविदा काढल्या असून काम लवकरच सुरू होणार आहे. कधी सुरू होणार काम, किती लागणार वेळ आणि काय असेल एकूण खर्च वाचा संपूर्ण बातमी

Published on -

Pune Metro Marathi news : पुणेकरांसाठी एक दिलासादायक बातमी आहे अनेक वर्षांपासून रखडलेल्या स्वारगेट ते कात्रज मेट्रो प्रकल्पाला अखेर गती मिळाली आहे. महाराष्ट्र राज्य सरकारने या भूमिगत मेट्रो प्रकल्पासाठी ६८३ कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी मंजूर केला आहे. या निर्णयामुळे बालाजीनगर आणि बिबवेवाडी ही दोन नव्याने प्रस्तावित स्थानके आता प्रत्यक्षात उभारली जाणार आहेत.

पूर्वीचा आराखडा

सुरुवातीला ५.४६ किमीच्या या भूमिगत मार्गावर फक्त तीन स्थानकांचा समावेश होता – मार्केट यार्ड, पद्मावती आणि कात्रज. मात्र, स्थानिक जनतेच्या मागण्या आणि राजकीय दबावामुळे बालाजीनगर आणि बिबवेवाडी या दोन महत्त्वाच्या भागांना स्थानक देण्याची गरज समोर आली. पुणे महानगरपालिकेने या स्थानकांसाठी मंजुरी दिली असली, तरी निधी देण्यास नकार दिल्याने प्रकल्प रखडला होता.

राज्य सरकारचा पुढाकार

राज्य सरकारने पुढाकार घेत अतिरिक्त खर्च उचलण्याचे ठरवले आणि महा मेट्रोने सर्व पाच स्थानकांसाठी नवीन निविदा काढल्या. या निविदा ४० दिवसांसाठी खुल्या राहतील आणि त्यानंतर त्यांचे मूल्यांकन करून ठेकेदार निश्चित केला जाईल. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, प्रत्यक्ष काम ३ ते ४ महिन्यांत सुरू होण्याची शक्यता आहे.

प्रकल्पाचा खर्च

महा मेट्रोचे कार्यकारी संचालक हेमंत सोनवणे यांनी स्पष्ट केले की, “राज्य सरकारने अतिरिक्त स्थानकांचा खर्च उचलण्याचे ठरवले आहे. त्यामुळे एकूण पाच स्थानकांचा समावेश असलेला नवीन आराखडा तयार करण्यात आला आहे आणि लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल.”

वाहतूक कोंडीवर रामबाण उपाय

अपग्रेड झालेल्या या प्रकल्पासाठी आता एकूण खर्च ४,३०० कोटींपेक्षा जास्त होणार आहे. तसेच, हा मेट्रो मार्ग पूर्ण होण्यासाठी चार वर्षांचा कालावधी लागणार आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर स्वारगेट, बिबवेवाडी आणि कात्रज परिसरातील वाहतूक कोंडीस मोठा दिलासा मिळेल आणि मध्य व दक्षिण पुण्याच्या वाहतुकीवर सकारात्मक परिणाम होईल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News