अहिल्यानगर: गत आठवड्यात तापमानाचा पारा ३९ अंशावर गेला होता. त्यानंतर ढगाळ हवामानामुळे पुन्हा एक ते दोन अंशांनी तापमानाचा पारा घसरला. मात्र सोमवारी पुन्हा तापमानाचा पारा ३९ अंशावर गेला. है दिवसभरातील कमाल तापमान होते. अवकाळी पाऊस आला तर पारा घसरण्याची शक्यता आहे, अन्यथा पारा ४० अंशाच्यापुढे जाईल, असे तज्ज्ञांनी सांगितले.
अवकाळी पावसाचा अंदाज
ढगाळ हवामानामुळे मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात कमाल तापमानाचा पारा १ ते २ अंश सेल्सिअसने उत्तरला आहे. विदर्भात उष्णतेची लाट कायम आहे. पुढील एक ते दोन दिवसांत पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे राज्यातील अनेक भागांत अवकाळी पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.

रस्तेही पडले ओस
कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने तयार होणाऱ्या स्थितीमुळे राज्यात पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. वाढत्या उष्णतेमुळे बाष्पीभवनाच्या प्रक्रियेलाही वेग आला आहे. त्यामुळे काही भागांत पावसाचा शिडकावा होण्याचा अंदाज आहे. नगरचा पारा मात्र ३८ ते ३९ अंशावर गेला आहे. त्यामुळे दिवसभर उष्णतेची तीव्रता पहायला मिळत आहे. कडक उन्हामुळे रस्तेही ओस पडत आहेत. १ व २ एप्रिल रोजी ३४, ३५ अंशावर असणाऱ्या तापमानात आठवडाभर चढ-उतार व्हायचा. ५ एप्रिल रोजी ३७ अंशावर, तर ८ एप्रिल रोजी ३८ अंशाचर तापमान गेले होते.
दोन दिवसात तापमान वाढणार
रविवारी व सोमवारी दुपारच्यावेळी कमाल तापमान ३२ अंशावर गेले होते. पावसाचा इशारा अहिल्यानगर जिल्ह्यात नसल्याने आणखी दोन दिवसात तापमान ४० अंशाच्या पुढे जाईल, असे तज्ज्ञांनी सांगितले.
तज्ज्ञाचे आवाहन
नागरिकांनी स्वतःची काळजी घ्यावी. शक्यतो दुपारी १ ते ४ या वेळेत बाहेर जाणे टाळावे. भरपूर पाणी प्यावे. तहान लागलेली नसली तरी पाणी प्यावे. लिंबू सरबत, ताक, नारळ पाणी, उसाचा रस यांचे सेवन करावे, सुती, पेस्टल कलरचे सैलसर कपड़े घालावे, स्कार्फ, गॉगल यांचा वापर करावा. मुले, ज्येष्ठ आणि आजारी लोकांनी ११ ते ५ बाहेर जाणे टाळावे, असे आवाहन तज्ज्ञांनी केले आहे.
हवामान विभागाच्या संकेत स्थळावर अहिल्यानगच्या पुढे डेंश असतो. त्यामुळे या शहरात किती तापमान आहे, अधिकृतरीत्या समजू शकत नाही. थंडीच्या दिवसांमध्ये संकेतस्थळावर अहिल्यानगरची नोंद केली जात होती. मात्र गेल्या काही दिवसांपासून ही नोंद गायब झाल्याचे दिसते. दरम्यान, एका महाविद्यालयातील तापमापक यंत्राचा संपर्क तुटल्याने ही नोंद होत नसल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामध्ये दुरुस्ती मुरू असल्याचेही सांगण्यात आले.
१ एप्रिल ते ९ एप्रिल या दहा दिवसांत नगरमध्ये तापमानात सरासरीपेक्षा २ ते ५ डिग्री सेल्सिअस एवढी वाढ झाली होती. रात्री सुद्धा २२ ते २७ अंश सेल्सिअस एवढे तापमान असते. गेल्या काही दिवसांपासून तापमान ३९ ते ४० अंशावर आहे.
डॉ. सतीश कुलकर्णी, पर्यावरण तज्ज्ञ