Maharashtra New Expressway : गेल्या काही वर्षांमध्ये आपल्या राज्यात विविध महामार्ग प्रकल्पांची कामे पूर्ण झाली आहेत. तसेच अजूनही अनेक रस्ते विकासाच्या प्रकल्पांची कामे सुरू आहे तर काही कामे प्रस्तावित करण्यात आली आहे म्हणजे आगामी काळात ही कामे सुरू होणार आहेत.
राज्यातील रस्ते कनेक्टिव्हिटी वाढवण्याच्या अनुषंगाने शासनाच्या माध्यमातून विविध प्रकल्पांवर काम सुरू आहे. मुंबई – पुणे एक्सप्रेस वे वरील वाहतूक कोंडीचा प्रश्न निकाली निघावा यासाठी मिसिंग लिंक प्रकल्पाचे काम सुद्धा हाती घेण्यात आले आहे.

एकीकडे या प्रकल्पाचे काम युद्ध पातळीवर सुरू असताना आता मुंबई पुणे एक्सप्रेस वे बाबत एक नवीन बातमी समोर आली आहे. खरे तर मिसिंग लिंक प्रकल्पाचे काम जवळपास अंतिम टप्प्यात आले आहे. हा प्रकल्प येत्या काही दिवसांनी सर्वसामान्यांसाठी सुरू होण्याची दाट शक्यता आहे.
अशी सगळी परिस्थिती असतानाच आता या एक्सप्रेसवेचे रुंदीकरण केले जाणार आहे. हा एक्सप्रेस वे सहा पदरी आहे मात्र याचे रुंदीकरण करत हा एक्सप्रेस वे आठ पदरी केला जाणार आहे. मुंबईच्या दिशेने एक आणि पुण्याच्या दिशेने एक अशा दोन लेन वाढवल्या जाणार आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, या एक्सप्रेस वे च्या सुमारे 70 किलोमीटर लांबीच्या आठ पदरीकरणासाठी जवळपास 100 हेक्टर जागेची गरज भासणार आहे.म्हणजे त्या जागेचे संपादन करावे लागणार आहे.
दरम्यान, यासाठीचा प्रस्ताव मात्र शासनाकडे रवाना झाला असून शासन दरबारी यावर विचार सुरू आहे. आता या प्रस्तावास शासनाकडून लवकरच मान्यता मिळण्याची शक्यता आहे.
असे झाल्यास द्रुतगती महामार्गाची क्षमता वाढणार आहे अन यामुळे मुंबई ते पुणे दरम्यान चा प्रवास वेगवान होईल. सध्या या महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ सुरू आहे आणि यामुळे हा महामार्ग अपुरा पडतोय. दरम्यान आता आपण या प्रस्तावाची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
कसा आहे प्रस्ताव?
पुणे- मुंबई द्रुतगती महामार्ग राज्यातील पहिलाच प्रवेश नियंत्रित महामार्ग आहे. म्हणजेच या महामार्गावर इंट्री आणि एक्झिट साठी स्पेशल पॉईंट आहेत. हा महामार्ग सहा पदरी असून याची लांबी सुमारे 94 किलोमीटर इतकी आहे.
दरम्यान या महामार्गावर घाट सेक्शन मध्ये होणारी वाहतूक कोंडी विचारात घेऊन महामार्गावरील खोपोली एक्झिट ते कुसगाव या भागातील 13.3 किलोमीटर पर्यायी रस्ता अर्थात मिसिंग लिंक प्रकल्प विकसित केला जातोय. यामुळे वाहन चालकांना घाट सेक्शन बायपास करता येणार आहे.
सध्या याचे काम फारच वेगाने सुरू आहे. मिसिंग लिंक प्रकल्पाबाबत बोलायचं झालं तर या प्रकल्पांतर्गत 1.67 किलोमीटर आणि 8.92 किलोमीटर लांबीचे दोन बोगदे विकसित केले जात आहेत. आतापर्यंत या दोन्ही बोगद्याचे काम पूर्ण झाले आहे.
या प्रकल्पाच्या माध्यमातून आशिया खंडातील सर्वांत मोठ्या दरी पुलाचे काम देखील हाती घेण्यात आले आहे. हे देखील काम येत्या काही दिवसांनी पूर्ण होणार आहे. म्हणजेच या प्रकल्पाच्या माध्यमातून या महामार्गावरील खालापूर टोल ते खोपोली एक्झिटपर्यंत आठ पदरी रस्ता तयार करण्यात येत आहे.
दरम्यान आता यापुढे देखील हा महामार्ग आठ पदरी केला जाणार आहे. उर्से टोल नाक्यापासून पुढे द्रुतगती महामार्ग आठपदरी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून हे काम पूर्ण केले जाणार आहे.
त्यामुळे द्रुतगती महामार्ग सलग आठपदरी होऊन या महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहन चालकांना विनाअडथळा प्रवास करता येणे शक्य होणार आहे. पण, सद्यस्थितीत याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला असून यावर अजून अंतिम निर्णय झालेला नाही. पण आगामी काळात यावर निर्णय होईल आणि लवकरच हा महामार्ग आठ पदरी होईल अशी आशा आहे.