Ahilyanagar Politics News : अहिल्यानगर जिल्ह्यातील जलजीवन योजनेच्या कामावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार निलेश लंके यांनी जलजीवन योजनेतील कामकाजाची चौकशी व्हावी अशी मागणी केली होती. त्यानुसार केंद्र सरकारच्या पथकाने जिल्ह्यात येऊन प्रत्यक्ष कामाची तपासणी देखील केली. या चौकशीनंतर भाजपचे माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी थेट रोहित पवार आणि निलेश लंके यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
काय म्हणाले सुजय विखे पाटील?
सुजय विखे पाटलांनी सांगितले की, जलजीवन योजनेअंतर्गत झालेले बहुतांश काम आघाडी सरकारच्या कार्यकाळात मंजूर झाले असून, त्या काळात निवडण्यात आलेले ठेकेदार हे रोहित पवार आणि निलेश लंके यांच्याशी प्रत्यक्षपणे संबंधित आहेत. त्यांनी असा आरोप केला की, कर्जत-जामखेडमध्ये जे ठेकेदार काम करत आहेत, ते सर्व रोहित पवारांचे जवळचे आहेत. पारनेर भागातही लंके यांचेच लोक ठेकेदारी करत आहेत.

सरकार बदलल्यावर विरोधकांचा दबाव
सरकार बदलल्यानंतर सत्तेपासून दूर झालेल्या नेत्यांना आता नुकसान जाणवू लागले आहे, आणि म्हणूनच ते कामात भ्रष्टाचार असल्याचे सांगत चौकशीची मागणी करत आहेत, असे सुजय विखे यांचे म्हणणे आहे. त्यांनी असा दावा केला की, चौकशीचे मुद्दे फक्त राजकीय फायद्यासाठी उभे केले जात आहेत. वास्तविकपणे, हे काम त्यांच्या काळात सुरू झाले होते आणि ठेकेदारही त्यांच्याच शिफारसीने नेमले गेले होते.
काम मात्र आम्हालाच पूर्ण करावं लागतं
सुजय विखे पाटलांनी यावर टीका करताना म्हटले की, सरकार बदलल्यानंतर देखील मागील सरकारने नेमलेले ठेकेदार कायम आहेत, आणि त्यांच्याकडूनच आम्हाला काम करवून घ्यावं लागतं. अशा परिस्थितीत आम्हाला दोष देणं अन्यायकारक आहे. आम्ही ठेकेदार नेमलेले नाहीत, मात्र आमच्यावरच सगळी जबाबदारी येते, ही परिस्थिती आमच्यासाठी अडचणीत आणणारी आहे.