अहिल्यानगर दि.१५- नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील धार्मिक स्थळांना मोठ्या प्रमाणात भाविक भेट देण्याची शक्यता लक्षात घेता गर्दीचे योग्य व्यवस्थापन करण्यासाठी संबंधित यंत्रणांनी आतापासून नियोजन करावे आणि पर्यटकांसाठी सुविधा निर्माण करण्यावर भर द्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांनी केले.
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने जिल्ह्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी आयोजित पूर्वतयारी बैठकीत ते बोलत होते. बैठकीला अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, जिल्हा नियोजन अधिकारी दीपक दातीर आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डॉ. आशिया म्हणाले, उत्तर प्रदेशात कुंभ निमित्ताने धार्मिक पर्यटनात वाढ झाली आहे. त्यामुळे नाशिक सोबत अहिल्यानगर आणि छत्रपती संभाजीनगर येथील धार्मिक पर्यटनाला चालना देण्याचे शासनाचे प्रयत्न आहेत. त्यादृष्टीने धार्मिक स्थळांना जोडणारी वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी रेल्वेस्थानक, रस्ते, विमानतळ सुविधांच्या सुधारणेवर भर द्यावा.
पर्यटकांच्या गर्दीचे नियोजन करण्यासाठी आवश्यक सुविधांची निर्मिती करावी. आरोग्य सुविधा, सुरक्षा विषयक उपाययोजना, स्वच्छतागृह, प्रमुख रस्ते, परिसर सुशोभीकरण, पोलीस मदत केंद्रे आदी व्यवस्थेचे आतापासून नियोजन करावे. शिर्डी आणि शनीशिंगणापूर परिसरातील रस्त्यांना लागून वाहनतळ तयार करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने जागा निश्चित कराव्या.
शिर्डी येथे वाहतूकीला आतापासून शिस्त लागेल अशा उपाययोजना कराव्यात. मेळा कालावधीसाठी आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करावा. येणाऱ्या पर्यटकांना माहिती देण्यासाठी,आवश्यकतेनुसार मदत करण्यासाठी सर्व विभागाचे अधिकारी एका ठिकाणी असतील अशाप्रकारे मदत केंद्र उभारण्यासाठी प्रस्ताव तयार करावा. प्रमुख धार्मिक स्थळांच्या मार्गांवर सूचना फलक लावण्यात यावे, अशा सूचना त्यांनी दिल्या.
मुख्याधिकारी सतीश दिघे यांनी सादरणीकरणाद्वारे सिंहस्थाच्या अनुषंगाने आवश्यक पूर्वतयारीची माहिती दिली.