अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा येथे संत शेख महंमद महाराज यांच्या समाधीस्थळावरून नवा वाद उफाळला आहे. हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या या स्थळावर मंदिराच्या जीर्णोद्धाराला विरोध करत ‘सुफी संत शेख महंमद बाबा दर्गाह’ नावाने ट्रस्ट स्थापन करण्यात आल्याने स्थानिक ग्रामस्थ आणि वारकरी संप्रदाय संतप्त झाले आहेत.
या वादाला तोंड फोडत ह.भ.प. बंडा तात्या कराडकर यांनी आंदोलनाला पाठिंबा देत “सौगंद मोहम्मद की खाते है, मंदिर यही बनायेंगे” अशी घोषणा दिली. तसेच, याप्रकरणी ते स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असल्याचे जाहीर केले आहे.

मंदिर की दर्गाह?
श्रीगोंदा येथील संत शेख महंमद महाराज हे संत तुकाराम महाराजांचे समकालीन आणि भागवत धर्माचे प्रचारक म्हणून ओळखले जातात. मुस्लिम कुटुंबात जन्मलेल्या या संताने हिंदू धर्म स्वीकारून भागवत धर्माचा प्रसार केला. त्यांच्या संजीवन समाधीचे स्थळ श्रीगोंद्यात आहे, जिथे दरवर्षी समाधी उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो.
या स्थळावर मंदिर उभारण्याची ग्रामस्थ आणि यात्रा समितीची दीर्घकालीन इच्छा आहे. मात्र, संत शेख महंमद यांचे वंशज असल्याचा दावा करणाऱ्या अमीन शेख यांनी या परिसरात ‘सुफी संत शेख महंमद बाबा दर्गाह’ नावाने ट्रस्ट स्थापन केले. यामुळे ग्रामस्थांमध्ये नाराजी पसरली आणि हा वाद पेटला.
बंडा तात्या कराडकरांचा आक्रमक पवित्रा
या वादाला तोंड फोडत ह.भ.प. बंडा तात्या कराडकर यांनी श्रीगोंद्यातील आंदोलनस्थळी हजेरी लावली. “सौगंद मोहम्मद की खाते है, मंदिर यही बनायेंगे” अशी घोषणा देत त्यांनी आपल्या परखड भाषणाची सुरुवात केली. संत शेख महंमद महाराज हे हिंदू आणि मुस्लिम समाजाचे ऐक्याचे प्रतीक असल्याचे सांगत,
कोणीही या ऐक्यात विघ्न आणू नये, असे आवाहन त्यांनी केले. अमीन शेख यांच्यावर टीका करताना ते म्हणाले, “बासुंदी तयार करण्यासाठी अनेक साहित्य लागते, पण ती खराब करण्यासाठी अमीन शेखसारखा एक खडा पुरेसा आहे. असा खडा बाजूला करणे गरजेचे आहे.”
संत शेख महंमद महाराज संपूर्ण महाराष्ट्राचे
कराडकर यांनी पुढे सांगितले की, संत शेख महंमद महाराज हे केवळ एका समाजाचे नाहीत, तर संपूर्ण महाराष्ट्राचे आहेत. त्यांच्या समाधीस्थळाचा जीर्णोद्धार तातडीने व्हावा, यासाठी ते स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत. “आम्हाला बेमुदत धरणे आंदोलनाची वेळ आणू नका,” असा इशारा देत त्यांनी शासनाला चुकीचा ट्रस्ट रद्द करण्याची मागणी केली.
संत शेख महंमद महाराज : हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक
संत शेख महंमद महाराज यांचा जन्म मुस्लिम कुटुंबात झाला असला, तरी त्यांनी भागवत धर्म स्वीकारून हिंदू धर्माचा प्रचार-प्रसार केला. त्यांची कविता आणि भक्तीपर कार्य यामुळे ते महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायात आदरणीय मानले जातात.
श्रीगोंदा येथील त्यांचे समाधीस्थळ हे हिंदू आणि मुस्लिम समाजातील ऐक्याचे प्रतीक मानले जाते. दरवर्षी येथे होणारा समाधी उत्सव दोन्ही समाजांचा सहभाग दर्शवतो. मात्र, दर्गाह ट्रस्टच्या स्थापनेमुळे या ऐक्याला तडा जाण्याची भीती ग्रामस्थांना वाटत आहे
ग्रामस्थांची प्रमुख मागणी आहे की, शासनाने दर्गाह ट्रस्ट रद्द करून मंदिराचा जीर्णोद्धार त्वरित सुरू करावा. संत शेख महंमद महाराज हे हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असल्याने त्यांच्या समाधीस्थळावर कोणताही वाद निर्माण होऊ नये, अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.