अहिल्यानगरमधील ‘या’ काॅलेजमध्ये अचानक पोलिसांची एंन्ट्री, विद्यार्थ्यांना काढले बाहेर, मुलींंचं वसतिगृह केलं रिकामं, इमारतीला टाळे ठोकून काॅलेजचा घेतला ताबा!

काकासाहेब म्हस्के कॉलेजचा न्यायालयाच्या आदेशानुसार पोलिस संरक्षणात ताबा घेतल्याने विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. पाच वर्षांपासून सुरू असलेल्या जागेच्या वादानंतर अचानक महाविद्यालय रिकामे करण्यात आले.

Published on -

अहिल्यानगर- सावेडी नाका परिसरातील दिवंगत काकासाहेब म्हस्के नर्सिंग कॉलेजच्या जागेवरून गेल्या पाच वर्षांपासून सुरू असलेल्या वादाला गुरुवारी, १७ एप्रिल २०२५ रोजी नाट्यमय वळण मिळाले.
न्यायालयाच्या आदेशानुसार बांधकाम व्यावसायिकाने पोलिस संरक्षणात कॉलेजचा ताबा घेतला, ज्यामुळे विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांमध्ये एकच खळबळ उडाली.

अचानक झालेल्या या कारवाईने महाविद्यालय रिकामे झाले असून, ८०० विद्यार्थ्यांचे भवितव्य अनिश्चित झाले आहे. प्रशासनाने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, असे आश्वासन दिले.

नेमका काय आहे वाद?

नगर-मनमाड रोडवरील सावेडी नाका येथील १६ एकर २० गुंठे जागेवर असलेले काकासाहेब म्हस्के मेमोरियल फाउंडेशनचे नर्सिंग कॉलेज नर्सिंग, बीएचएमएस यासह विविध अभ्यासक्रम शिकवते. ही जागा कॉलेज व्यवस्थापनाने वडगाव गुप्ता येथील चांद अब्बास सय्यद आणि वजीर अब्बास सय्यद यांच्या ट्रस्टकडून भाडेतत्त्वावर घेतली होती.

मात्र, १० ऑगस्ट २०१८ रोजी न्यायालयाने हा भाडेकरार रद्द करत जागा खाली करण्याचे आदेश दिले. २०१९ मध्ये बांधकाम व्यावसायिक अनिल बबनराव जाधव यांनी ही जागा विकत घेतली. त्यांनी जागेचा ताबा मिळवण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल केली, आणि २२ मार्च २०२५ रोजी त्यांच्या बाजूने निकाल लागला. या निकालाच्या आधारे जाधव यांनी पोलिस संरक्षणात कॉलेजचा ताबा घेतला.

पोलिस संरक्षणात कारवाई

गुरुवारी दुपारी जाधव न्यायालयाच्या बेलिफ आणि पोलिसांसह कॉलेज परिसरात दाखल झाले. कॉलेज व्यवस्थापनाशी चर्चा झाली, परंतु तोडगा निघाला नाही. सायंकाळी पोलिस संरक्षणात विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना कॉलेजबाहेर काढण्यात आले. कॉलेज परिसरातील मुलींचे वसतिगृहही रिकामे करण्यात आले. या अचानक कारवाईमुळे पालकांनी कॉलेजकडे धाव घेतली, ज्यामुळे काही वेळ तणाव निर्माण झाला. “पोलिसांनी हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली. एक अधिकारी आणि पाच कर्मचाऱ्यांच्या बंदोबस्तात ही कारवाई झाली,” असे सहायक पोलिस निरीक्षक माणिक चौधरी यांनी सांगितले. कॉलेजच्या प्रशासकीय आणि इतर इमारतींना टाळे लावण्यात आले.

प्रशासनाची भूमिका

कॉलेजमध्ये ८०० विद्यार्थी शिक्षण घेत असून, या कारवाईमुळे त्यांच्यामध्ये भीती आणि अनिश्चिततेचे वातावरण आहे. पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाचे वातावरण असताना, कॉलेजचे मुख्य कार्यकारी अधिकारी समीर ठाकरे आणि माजी प्राचार्या डॉ. नीलिमा भोज यांनी सोशल मीडियाद्वारे विद्यार्थ्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. “विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ देणार नाही. अफवांवर विश्वास ठेवू नका आणि व्यवस्थापनाला वेळ द्या. सर्वकाही ठीक होईल,” असे त्यांनी सांगितले.

कायदेशीर मार्गाने जागा घेतली

अनिल जाधव यांनी आपली बाजू मांडताना सांगितले की, त्यांनी कायदेशीर मार्गाने जागा विकत घेतली आहे. “न्यायालयाचा निकाल माझ्या बाजूने आहे. मी कॉलेज व्यवस्थापनाशी चर्चा करून त्यांना मदत करण्यास तयार होतो, पण त्यांनी न्यायालयाच्या आदेशाला जुमानले नाही. त्यामुळे पोलिस संरक्षणात ताबा घ्यावा लागला,” असे त्यांनी स्पष्ट केले. या प्रकरणात काहींनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही त्यांनी केला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe