जामखेड- मतदारसंघात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वागताचे फलक आमदार रोहित पवार यांच्या नावाने लागल्याने राजकीय वादाला तोंड फुटले आहे. या फलकांवरून निर्माण झालेल्या गैरसमजांना पूर्णविराम देत रोहित पवार यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन खुलासा केला.
“अजित पवार माझे काका आणि उपमुख्यमंत्री आहेत, त्यांच्या स्वागताचे फलक कार्यकर्त्यांनी माझ्या नावाने लावले यात काही गैर नाही,” असे सांगत त्यांनी आपली शरद पवार यांच्यासोबतची निष्ठा कायम असल्याचे स्पष्ट केले. याचवेळी त्यांनी कर्जत नगरपंचायतीतील सत्ताबदलावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले.

रोहित पवारांची भूमिका
कर्जत-जामखेड मतदारसंघात अजित पवार यांचा जाहीर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या निमित्ताने मतदारसंघात रोहित पवार यांच्या नावाने अजित पवार यांच्या स्वागताचे फलक लावण्यात आले. यामुळे रोहित पवार यांची राजकीय भूमिका बदलली असल्याची चर्चा सुरू झाली. मात्र, पुण्यातील पत्रकार परिषदेत रोहित पवार यांनी हे आरोप फेटाळले.
“अजित पवार हे उपमुख्यमंत्री आहेत आणि माझे काका आहेत. कार्यकर्त्यांनी माझ्या नावाने स्वागत फलक लावले, याचा अर्थ मी भूमिका बदलली असा होत नाही. मी आणि माझी कंपनीवर ईडीच्या चौकश्या झाल्या, पण मी माझ्या तत्त्वांवर ठाम आहे. मी शरद पवार यांच्यासोबत आहे आणि पळून जाणाऱ्यांपैकी नाही,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.
नगरपंचायतीच्या सत्ताबदलावर टीका
रोहित पवार यांनी कर्जत नगरपंचायतीतील सत्ताबदलावरून राज्य सरकारवर जोरदार हल्ला चढवला. दोन वर्षांपूर्वी कर्जत नगरपंचायतीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचारसरणीच्या नगरसेवकांनी सत्ता मिळवली होती. त्या वेळी भाजपचे केवळ दोन नगरसेवक होते. मात्र, अलीकडेच अध्यक्ष उषा राऊत यांच्याविरुद्ध अविश्वास ठराव आणला गेला. रोहित पवार यांनी या प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “अविश्वास ठरावाची प्रक्रिया ठरलेली आहे, पण सरकारच्या आशीर्वादाने ही पद्धतच बदलण्यात आली. विशेष अध्यादेश काढून नियमांना बगल देण्यात आली,” असा गंभीर आरोप त्यांनी केला.
फडणवीस आणि शिंदेंवर आरोप
रोहित पवार यांनी या सत्ताबदलामागे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांचा हात असल्याचा थेट आरोप केला. “राम शिंदे यांच्या पाठिंब्याने आणि फडणवीस यांच्या हस्तक्षेपामुळे कर्जत पंचायतीतील सत्ता हस्तांतरण झाले. हे सरकार सत्तेशिवाय काहीच पाहत नाही,” असे ते म्हणाले. यासोबतच त्यांनी भाजपच्या कार्यपद्धतीवरही टीका केली. “भाजपमध्ये बाहेरून येणाऱ्या नेत्यांमुळे मूळ कार्यकर्त्यांना मंत्रिपदे मिळत नाहीत. आशिष शेलार आणि गिरीश महाजन यांची उदाहरणे यातून दिसतात,” असे त्यांनी नमूद केले.
राजकीय प्रवेश
काँग्रेसचे माजी आमदार संग्राम थोपटे यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेकडे लक्ष वेधले असता, रोहित पवार यांनी सरकारच्या रणनीतीवर बोट ठेवले. “अशा प्रवेशांमुळे भाजपच्या मूळ कार्यकर्त्यांचे नुकसान होत आहे. सरकार विरोधकांना कमजोर करण्यासाठी अशी पावले उचलत आहे,” असे त्यांनी सांगितले. कर्जत पंचायतीतील सत्ताबदल हा त्याच रणनीतीचा भाग असल्याचा दावाही त्यांनी केला.