खडतर परिस्थितीवर मात करत अहिल्यानगरच्या कन्येची गगनभरारी, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारावर कोरले नाव

Updated on -

अहिल्यानगर- सारोळा कासार गावची कन्या संयुक्ता प्रसेन काळे हिने रिदमिक जिम्नॅस्टिक्समध्ये घवघवीत यश मिळवत महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. तिच्या या अप्रतिम कामगिरीची दखल घेत महाराष्ट्र शासनाने २०२३-२४ साठी तिला शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार जाहीर केला आहे.

तीन लाख रुपये आणि सन्मानचिन्ह असा हा प्रतिष्ठित पुरस्कार आहे, जो राज्यातील क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च सन्मान मानला जातो. शुक्रवारी, १८ एप्रिल रोजी पुण्यातील बालेवाडी क्रीडा संकुलात राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते हा पुरस्कार तिला प्रदान केला जाणार आहे. संयुक्ताच्या या यशामागे तिच्या आई-वडिलांचा मोठा वाटा आहे, विशेषतः वडिलांच्या निधनानंतर आईच्या खंबीर पाठिंब्याने तिने हे यश खेचून आणलं.

अनेक स्पर्धामध्ये पदके

संयुक्ता मूळची सारोळा कासारची असली, तरी गेली काही वर्षे ती ठाण्यात राहते आणि तिथे प्रशिक्षक पूजा सुर्वे आणि मानसी सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली कठोर सराव करते. रिदमिक जिम्नॅस्टिक्समध्ये तिने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर तब्बल १५१ सुवर्ण आणि २५ रौप्य पदके मिळवली आहेत. ताश्कंद वर्ल्ड कप २०२३, फ्रान्समधील आंतरराष्ट्रीय स्पर्धा, खेलो इंडिया युथ गेम्स, नॅशनल गेम्स आणि थायलंडमधील आशियाई चॅम्पियनशिप यांसारख्या स्पर्धांमध्ये तिने आपल्या कौशल्याने सर्वांना थक्क केलं. मध्य प्रदेश, हरियाणा, चेन्नई येथील खेलो इंडियामध्ये तिने १२ सुवर्ण आणि २ रौप्य पदके, तर गुजरात, गोवा, उत्तराखंडमधील नॅशनल गेम्समध्ये ८ सुवर्ण आणि ३ रौप्य पदके जिंकली. थायलंडच्या पट्टायामध्ये झालेल्या वरिष्ठ आणि कनिष्ठ आशियाई रिदमिक जिम्नॅस्टिक्स चॅम्पियनशिपमध्येही तिने बाजी मारली.

आईची साथ

संयुक्ताच्या या यशात तिचे वडील प्रसेन काळे आणि आई अर्चना काळे यांचा सिंहाचा वाटा आहे. दुर्दैवाने गेल्या वर्षी प्रसेन काळे यांचं निधन झालं. पण या दुखऱ्या प्रसंगातही अर्चना काळे खचल्या नाहीत. त्यांनी संयुक्ताच्या स्वप्नांना पंख दिले आणि तिला प्रत्येक पावलावर साथ दिली. “आईने मला नेहमी प्रोत्साहन दिलं. तिच्यामुळे मी आज इथपर्यंत पोहोचले,” असं संयुक्ता कृतज्ञतेने सांगते. ती भूगर्भशास्त्रज्ञ प्रतापराव काळे, विक्रमराव काळे आणि रयत शिक्षण संस्थेचे माजी ऑडिटर प्राचार्य विश्वासराव काळे यांची नात आहे, याचा तिला विशेष अभिमान आहे.

जिल्ह्याचा गौरव

पुरस्कार वितरण समारंभाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. संयुक्ताच्या या यशाने सारोळा कासारसह संपूर्ण जिल्ह्याचं नाव उज्ज्वल झालंय. “हा पुरस्कार माझ्यासाठी प्रेरणा आहे. पुढेही असंच मेहनत करून देशाचं नाव मोठं करायचंय,” असं संयुक्ता आत्मविश्वासाने सांगते. तिच्या या यशाने अनेक तरुणांना प्रेरणा मिळेल, यात शंका नाही.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe