अहिल्यानगरचे नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. सौरभ हराळ यांना दिल्ली येथे झालेल्या आशिया-पॅसिफिक अकादमी ऑफ ऑप्थाल्मोलॉजी (एपीएओ) परिषदेत यंग रिसर्चर ॲवॉर्डने सन्मानित करण्यात आले. त्यांच्या डोळ्यांच्या ॲलर्जीवरील (आय ॲलर्जी) नवीन उपचार पद्धतीच्या संशोधनासाठी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
डॉ. सौरभ हराळ यांनी इंटरफेरॉन अल्फा 2बी या नवीन औषधांवर संशोधन केले, जे पारंपरिक उपचारांपेक्षा अधिक प्रभावी ठरले. डोळ्यांची ॲलर्जी ही एक सामान्य पण त्रासदायक समस्या असून, लहान मुलांपासून प्रौढांपर्यंत अनेकांना याचा त्रास होतो. सध्याच्या उपचारांमध्ये तात्पुरता आराम मिळतो, पण औषध थांबवल्यावर त्रास परत होतो. डॉ. हराळ यांच्या संशोधनाने या अडचणीवर प्रभावी आणि दीर्घकालीन उपाय मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

या परिषदेत जगभरातील नेत्ररोगतज्ज्ञांनी आपले संशोधन सादर केले होते, आणि डॉ. सौरभ हराळ हे सर्वात तरुण संशोधक होते. त्यांचे मूळ गाव अहिल्यानगर असून, त्यांनी दिल्लीत तीन वर्षे यशस्वी प्रॅक्टिस केल्यानंतर आता आपल्या गावात हराळ नेत्रालय, प्रोफेसर कॉलनी, सावेडी, अहिल्यानगर येथे सेवा देत आहेत. एम.एस. परीक्षेत सुवर्णपदक मिळवणारे डॉ. हराळ हे आपल्या जिल्ह्यासाठी आणि राज्यासाठी अभिमानाचा विषय आहेत.
डॉ. सौरभ हराळ यांच्या या उल्लेखनीय यशामुळे अहिल्यानगरचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर उजळले आहे. त्यांच्या संशोधनामुळे डोळ्यांच्या ॲलर्जीने त्रस्त रुग्णांना मोठा दिलासा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.