ह्या कारणामुळे झालं माझं वाटोळे ! सुजय विखे पाटलांनी श्रीगोंद्यात संगळंच सांगितलं…

Published on -

साकळाई उपसा सिंचन योजनेसाठी पाणी राखीव ठेवण्यात आलं आहे, पण घोडच्या पाण्याला हात लावलेला नाही. या योजनेचा ४९५ कोटींचा प्रस्ताव राज्यस्तरीय तांत्रिक समितीकडे पाठवण्यात आला असून, महिन्याभरात मान्यता मिळण्याची शक्यता आहे. येत्या तीन महिन्यांत निविदा प्रक्रिया पूर्ण करून भूमिपूजन करण्याची जबाबदारी माझी आहे, अशी हमी श्रीगोंदेकराना माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिली.

कर्जत, श्रीगोंदा आणि पारनेरच्या शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणाऱ्या डिंभे-माणिकडोह बोगद्याबाबत बरीच चर्चा आहे. या बोगद्याचं काम जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या कार्यकाळातच सुरू होईल, असा विश्वास सुजय विखे यांनी व्यक्त केला.लोकसभा निवडणुकीत काहींनी साथ देऊनही माझा पराभव केला. त्यांची यादी माझ्या मनात आहे. आगामी निवडणुकांमध्ये त्यांच्याशी हिशोब चुकता करेन, असा इशारा विखे पाटील यांनी दिला.

श्रीगोंदे तालुक्यातील कोरेगाव येथील एका कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी राजकीय चिखलफेकही झाली. विखे म्हणाले, “श्रीगोंद्यात चांगलं काम करणाऱ्यांचा सत्कार होतो, ही बाब केवळ इथेच दिसते. मी श्रीगोंद्यामुळे पराभूत झालो, यात दुमत नाही. पण मी श्रीगोंद्याच्या जनतेवर नाराज नाही. ही जनता समजूतदार आहे. मात्र, नेत्यांची ‘खात्री’ कोणीच देऊ शकत नाही. तालुक्यातील काही नेत्यांशी जवळीक ठेवल्याने माझं वाटोळे झाले.”

बोलताना पुढे ते म्हणाले, “आता ही चूक सुधारून मी थेट जनतेशी जोडला जाईन. खासदारकी नसली तरी मला फरक पडत नाही. पण तालुक्याला मागे नेणारी एक चूक झाली, याचा कोणी विचार केला नाही.” या कार्यक्रमात बाळासाहेब मोहारे आणि दादासाहेब साबळे यांनी स्वागत केलं. माजी सभापती बाळासाहेब गिरमकर, दिनकर पंदरकर, रमेश गिरमकर, सिद्धेश्वर देशमुख, शहाजी हिरवे, पुरुषोत्तम लगड, रामदास झेंडे उपस्थित होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe