अहिल्यानगर : साध्य राज्यभरात विविध गावातील देवी देवतांच्या यात्रा महोत्सव सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर उभ्या महाराष्ट्रातील आदिवासी भिल्ल समाजाची प्रती पंढरी समजल्या जाणाऱ्या अकोले तालुक्यातील पिंपळदरी येथील येडूआई देवीच्या वार्षिक यात्रेला यंदा विक्रमी गर्दी झाली.
तीन ते चार लाखांहून अधिक भाविकांनी दर्शन घेतले, तर गडाच्या पायथ्याशी असलेल्या ‘गाडीवान’ देवाला नवसपूर्तीसाठी सुमारे दोन हजार बोकडांचा बळी देण्यात आला. ही यात्रेतील प्रमुख धार्मिक परंपरा असून अनेक रूढी, परंपरा आणि आदिवासी संस्कृतीचे दर्शन यामधून घडले.

पिंपळदरी गावालगत नांदळा डोंगरावर येडूआई देवीचे मूळ स्थान असून, पायथ्याशीही तिचे एक मंदिर आहे. त्यासमोरच गाडीवान या देवाचे लहान मंदिर आहे. यात्रेला महाराष्ट्रभरातून तसेच कर्नाटकातूनही भाविक मोठ्या संख्येने येतात. हनुमान जयंतीपासून यात्रेला प्रारंभ होतो. चैत्र पौर्णिमेला सकाळी हनुमान मंदिरापासून मांडव-डहाळे आणण्याची परंपरा आहे.
यात्रेच्या काळात खेळणी, औषधी वनस्पती, गलुरची दुकाने आणि अनेक खाद्यपदार्थांचे स्टॉल्स थाटले जातात. तृतीयपंथींचीही लक्षणीय उपस्थिती होती. सामाजिक संस्थांनी मोफत भोजनछत्र चालवून भाविकांची सेवा केली.
देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब बर्डे, उपाध्यक्ष संजय रंधे, रावसाहेब रंधे, गणेश रंधे, श्रीहरी मांडे, श्रीरंग कडाळी, राजेंद्र बर्डे, ज्ञानेश्वर बर्डे, विठ्ठल बर्डे, गणेश चौधरी इत्यादी विश्वस्तांनी यात्रेच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले.
उपविभागीय पोलीस अधिकारी कुणाल सोनवणे व पोलिस निरीक्षक मोहन बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला. भाविकांसाठी राहण्याची व्यवस्था परिसरातील शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतात तंबू उभारून केली होती.
येडूआई यात्रा म्हणजे फक्त एक धार्मिक उत्सव नव्हे, तर ती आदिवासी भिल्ल समाजाच्या परंपरा, श्रद्धा आणि सांस्कृतिक एकतेचे प्रतीक आहे. बोकड बळीपासून परडी परंपरेपर्यंत आणि मानाच्या काठीपासून मोफत अन्नदानापर्यंत, ही यात्रा भाविकांच्या श्रद्धेचे आणि गावकऱ्यांच्या एकतेचे जिवंत चित्र उभे करते.