शिर्डी- शिर्डी येथे देशातील पहिला सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प सुरू झाला असून, यातून शुद्ध केलेलं पाणी शेतीसाठी उपलब्ध करून दिलं जाणार आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून हा प्रकल्प साकारला असून, केंद्र सरकारच्या अमृत २.० योजनेंतर्गत मलनिःसरण प्रकल्पाचा भाग म्हणून त्याचं लोकार्पण झालं.
माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी या प्रकल्पाच्या उद्घाटनप्रसंगी शेतकऱ्यांच्या पाण्याचे हक्क जपण्याचं आश्वासन दिलं, तसंच साईबाबा संस्थानातील व्हीआयपी दर्शनाच्या गैरव्यवस्थेवर उपोषणाचा इशारा दिला.

सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प
शिर्डीत सुरू झालेला सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प देशातला पहिलाच आहे, जो सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते शेतीसाठी उपयुक्त बनवतो. टर्शरी ट्रीटमेंट प्लँटच्या लोकार्पण सोहळ्यात डॉ. सुजय विखे यांनी या प्रकल्पाचं महत्त्व विशद केलं. “हा प्रकल्प शिर्डीच्या पाणीप्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढेल. शेतकऱ्यांना प्रक्रिया केलेलं पाणी मिळेल, ज्यामुळे शेतीला फायदा होईल,” असं ते म्हणाले.
हा प्रकल्प पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकाराने साकारला असून, यामुळे शिर्डी परिसरातील शेतकऱ्यांचा पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होईल. याशिवाय, पुढील आठवड्यात गोदावरी नदीच्या रुंदीकरणाचं १९० कोटींचं काम सुरू होणार असल्याची घोषणाही त्यांनी केली.
अतिक्रमणांविरोधात कारवाई
शेतकऱ्यांचे पाण्याचे हक्क जपण्यासाठी डॉ. विखे यांनी ठाम भूमिका घेतली. “शेतकऱ्यांचं पाणी कोणत्याही परिस्थितीत अडवलं जाणार नाही. मग ते नगरसेवक असो वा नगराध्यक्ष, कोणाचंही अतिक्रमण खपवून घेतलं जाणार नाही,” असं त्यांनी स्पष्ट केलं. शेतकऱ्यांचं हित डोळ्यासमोर ठेवूनच निर्णय घेतले जातील, असं आश्वासन त्यांनी दिलं. “पाणी हा शेतकऱ्यांचा जन्मसिद्ध हक्क आहे. त्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत,” असं ते म्हणाले.
व्हीआयपी दर्शन
श्री साईबाबा संस्थानातील व्हीआयपी दर्शनाच्या गैरव्यवस्थेवर डॉ. विखे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. “तिरुपतीप्रमाणे काकड आरतीनंतर फक्त दोन तास व्हीआयपी दर्शन मर्यादित ठेवावं. या नावाखाली चालणारी गैरव्यवस्था थांबवली पाहिजे,” असं त्यांनी सांगितलं. यासाठी सर्व ग्रामस्थ आणि पक्षांनी एकत्र येऊन भूमिका घ्यावी, असं आवाहन त्यांनी केलं. “आम्ही येत्या आठ दिवसांत संस्थानला निवेदन देऊ. एका महिन्यात निर्णय न झाल्यास मी स्वतः संस्थानच्या प्रांगणात उपोषणाला बसणार,” असा इशारा त्यांनी दिला.
गुन्हेगारीविरोधातील लढा
शिर्डीत गेल्या काही महिन्यांपासून अनेक बदल घडताहेत. “ही कारवाई कोणाविरोधात नाही, तर गुन्हेगारीविरोधात आहे,” असं डॉ. विखे यांनी स्पष्ट केलं. “दारूच्या भट्ट्यांची माहिती द्या, दुसऱ्याच दिवशी तिथे जेसीबी जाईल आणि त्या उद्ध्वस्त होतील,” असं आवाहन त्यांनी केलं. याशिवाय, शिर्डी, साकोरी शिव, पानमळा आणि कणकुरी रोड येथे अत्याधुनिक अंगणवाडी शाळांचं भूमिपूजन आणि शिर्डी बाजार तळाजवळील सांडपाणी प्रक्रिया केंद्राचं उद्घाटन त्यांच्या हस्ते झालं. “शिर्डीचा विकास हा आमचा प्राधान्याचा विषय आहे,” असं ते म्हणाले.
गद्दारांना क्षमा नाही
“विधानसभा निवडणुकीत आमच्याशी गद्दारी करणाऱ्यांची नावं मला माहिती आहेत. संघटनेत चुका माफ होऊ शकतात, पण गद्दारी कधीच माफ होणार नाही,” असा इशारा त्यांनी दिला. “माझ्याकडे व्हॉट्सअॅप चॅट, कॉल्स आणि बैठकींचे पुरावे आहेत. कोणीही सुटणार नाही,” असं त्यांनी ठणकावलं.