Maharashtra Schools : वर्गात शिवी? आता खैर नाही! विद्यार्थ्यांनो ‘या’ शहरात सुरू होतंय शिवीमुक्त शाळा अभियान; यापुढे वर्गात अपशब्द बोलला तर…

Published on -

Maharashtra Schools : विद्यार्थ्यांच्या वागण्यात दिवसेंदिवस वाढणाऱ्या अपशब्दांच्या सवयींवर नियंत्रण ठेवण्यासाठी ठाणे जिल्ह्यातील बदलापूर शहरात ‘शिवीमुक्त शाळा’ या आगळ्या-वेगळ्या अभियानाची सुरुवात करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या तोंडून सहज बाहेर पडणाऱ्या शिव्यांमुळे शाळेचे वातावरण बिघडत असल्याने आणि त्याचा इतर विद्यार्थ्यांवरही परिणाम होत असल्याने हे पाऊल उचलण्यात आले आहे.

‘शिवीमुक्त शाळा’ अभियान-

गेल्या काही वर्षांत तरुणांमध्ये, विशेषतः शाळकरी मुलांमध्ये, आपल्या मित्रांशी संवाद साधताना प्रेमाने किंवा गंमत म्हणूनही शिवी वापरण्याची प्रवृत्ती वाढली आहे. मात्र, हे शब्दच कधी भांडणात किंवा गैरसमजात बदलतात आणि त्या विद्यार्थ्यांच्या वर्तनावर दीर्घकालीन परिणाम होतो. या पार्श्वभूमीवर बदलापूरच्या आदर्श महाविद्यालयात नुकतीच एक बैठक पार पडली, ज्यात अंबरनाथ तालुका व आजूबाजूच्या भागांतील शिक्षक, मुख्याध्यापक व प्राचार्य सहभागी झाले होते.

या बैठकीचे आयोजन पंचायत समिती अंबरनाथच्या शिक्षण विभागाने केले होते. मुरबाडचे आमदार किसन कथोरे या बैठकीत उपस्थित होते आणि त्यांनीच ‘शिवीमुक्त शाळा’ या संकल्पनेची मांडणी केली. त्यांनी स्पष्ट सांगितले की, विद्यार्थ्यांच्या वर्तनावर शिक्षकांनी बारकाईने लक्ष ठेवावे आणि त्यांच्या तोंडी येणारे अपशब्द वेळेत थांबवले पाहिजेत. चांगल्या विचारांतूनच उत्तम समाज घडतो आणि यासाठी एक सुजाण पिढी घडवणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.

काय कारवाई होणार?

या अभियानाअंतर्गत शाळेत जर एखादा विद्यार्थी अपशब्द वापरत असेल तर त्याला दंड ठोठावला जाणार आहे. तसेच गरज भासल्यास त्याच्या पालकांना शाळेत बोलावून त्यांना संपूर्ण प्रकाराची माहिती दिली जाणार आहे. यामुळे पालकही आपल्या मुलांच्या वागणुकीकडे अधिक जागरूक होतील आणि शाळेच्या नियमांचे पालन करण्यात मदत होईल.

येत्या शैक्षणिक वर्षापासून हे अभियान अधिकृतपणे लागू होणार आहे. केवळ शाळांपुरतेच मर्यादित न ठेवता, हे अभियान महाविद्यालयांपर्यंत पोहोचवण्यासाठी दृकश्राव्य माध्यमांद्वारे जनजागृती केली जाणार आहे. या उपक्रमाला शालेय शिक्षक, मुख्याध्यापक आणि स्थानिक शैक्षणिक संस्थांनी चांगला प्रतिसाद दिला असून, आता पालकांचा सहभाग किती मिळतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe