Pune News :पुण्यातील नागरिकांसाठी एक महत्त्वाची आणि उपयोगी बातमी समोर आली आहे. आता रिक्षांप्रमाणेच कॅबमध्येही मीटरनुसार भाडे आकारले जाणार असून यामुळे प्रवाशांना योग्य दरात प्रवास करता येणार आहे. रॅपिडो या अॅपवर ही सेवा 18 एप्रिल 2025 पासून सुरू झाली असून ओला आणि उबर या अॅप्सवर 1 मे 2025 पासून मीटरप्रमाणे भाडे आकारले जाईल. हा निर्णय भारतीय गिग कामगार मंच (IGF) या संघटनेने घेतला असून पुण्यातील नवी सांगवी येथील PWD मैदानावर झालेल्या बैठकीत हा ठराव बहुमताने मंजूर करण्यात आला.
कॅबमध्ये मीटर लावले जाणार-
या ठरावानुसार, प्रत्येक कॅबमध्ये मीटर लावण्यात येईल आणि प्रवासाचे भाडे त्यानुसार आकारले जाईल. आरटीओने ठरवलेला दर म्हणजे 25 रुपये प्रति किलोमीटर यावर 16 टक्के सवलत देण्यात आली असून प्रत्यक्षात प्रवाशांकडून फक्त 21 रुपये प्रति किलोमीटर भाडे घेतले जाईल. यामुळे प्रवाशांना अचूक व पारदर्शक दरात प्रवासाची सोय होईल आणि मनमानी दर आकारणाऱ्या चालकांवर आळा बसणार आहे.

या निर्णयाला कॅब चालकांनी मोठ्या प्रमाणावर पाठिंबा दिला असून IGF चे अध्यक्ष डॉ. केशव नाना क्षीरसागर यांनी हा ठराव मांडला. कॅब चालक आणि प्रवाशांमध्ये मीटर दराची जागरूकता वाढावी म्हणून www.onlymeter.in या संकेतस्थळाचे अनावरणही करण्यात आले आहे. या वेबसाइटवर जाऊन प्रवासी रिक्षा व कॅबचे दर तपासू शकतात. याशिवाय प्रत्येक कॅबमध्ये माहिती पत्रक लावण्यात येईल, जेणेकरून प्रवाशांना मीटर दराची कल्पना मिळेल.
दर कुठे तपासणार?
हा निर्णय लागू झाल्यानंतर रॅपिडो, ओला आणि उबर वापरणाऱ्या प्रवाशांना सुलभ, पारदर्शक आणि विश्वासार्ह सेवा मिळणार आहे. त्यामुळे नागरिकांनी देखील मीटरनुसार भाडे आकारले जात आहे की नाही, याची खात्री करावी. तसेच कोणत्याही शंका असल्यास अधिकृत वेबसाइटवरून दराची तपासणी करता येईल.
या नव्या योजनेमुळे पुणेकरांचा प्रवास अधिक सुलभ आणि न्याय्य होणार असून, आरटीओच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार काम करणाऱ्या कॅबचालकांना याचा लाभ मिळणार आहे.