Ahilyanagar News : श्रीगोंदे शहराचे ग्रामदैवत संत शेख महंमद महाराज मंदिराच्या जीर्णोद्धाराचा प्रश्न सुटण्याऐवजी कठीण होत चालला आहे. दर्गाह ट्रस्टची वक्फ बोर्डाकडे नोंद झाल्याची नवी माहिती समोर आल्याने त्यावरून वाद निर्माण झाला आहे.
यामुळे मंदिर निर्माणात मोठा अडथळा निर्माण झाला आहे. दरम्यान, यावर तोडगा निघत नसल्याने यात्रा कमिटीतर्फे सुरू असलेले आंदोलन तिसऱ्या दिवशीही सुरू होते. गावबंदचा निर्णय मात्र मागे घेण्यात आला.

मंदिर निर्माण, वक्फ बोर्ड आणि धर्मादाय आयुक्तांकडील महंमद बाबा दर्गाह ट्रस्ट अशी असलेली नोंद रद्द होऊन अटी मान्य होत नाहीत तोपर्यंत धरणे आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय यात्रा कमिटी व ग्रामस्थांच्या बैठकीत घेण्यात आला.
त्याचप्रमाणे आमीन शेख एकीकडे मंदिराला विरोध नसल्याचे सांगून दुसरीकडे त्यांनी दर्गाहची वक्फ बोर्डकडे नोंद लावली. शेख महंमद दर्गाह ट्रस्टची वक्फ बोर्डाकडे नोंद झाल्याची माहिती समोर आली.
सोशल मीडियावर तसे मेसेज व्हायरल झाले. तसे असल्यास वक्फ बोर्डाची मालकीची नोंद रद्द करावी लागणार आहे. त्यानंतरच मंदिर निर्माणाचा मार्ग मोकळा होईल. शेख महंमद बाबा दर्गाहची नोंद वक्फ बोर्डाकडे झाल्याचे समोर येताच बजरंग दल आक्रमक झाले आहे.
ही नोंद रद्द करून मंदिर निर्माणात शेख कुटुंबाने सहकार्य करावे, अन्यथा बजरंग दल आक्रमक भूमिका घेईल, असा इशारा बजरंग दल अध्यक्ष कालिदास कोथिंबीरे यांनी दिला आहे.
तरुणांनी घेतली आमदारांसोबत बैठक
दोन दिवस गावबंद ठेवल्याने सर्वसामान्य व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले. त्याचा विचार करून तरुणांनी आमदारांच्या निवासस्थानी जात गावाबंदचा निर्णय मागे घेण्याची विनंती आमदार विक्रम पाचपुते यांना केली. त्यावेळी आ. पाचपुते यांनी यात्रा कमिटी व दर्गाह ट्रस्ट दोघेही माहिती लपवत असल्याबाबत नाराजी व्यक्त केल्याचे सांगण्यात आले.
शासन दरबारी मंदिरासाठी प्रयत्न करण्याचा शब्द दिल्यानंतर गावबंदचा निर्णय मागे घेण्यात आला. शेख दुटप्पी भूमिका घेत असल्याचा आरोप करण्यात आला. दरम्यान, या प्रकारामुळे जीर्णोद्धाराचा प्रश्न अधिक गुंतागुंतीचा झाला आहे.