Maharashtra Bus : राज्यातील शिर्डी, अक्कलकोट आणि गाणगापूरला जाणाऱ्या भाविकांसाठी एसटी महामंडळाच्या माध्यमातून एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. खरे तर सध्या उन्हाळी सुट्ट्यांचा सिझन सुरू आहे आणि अनेक जण पिकनिकसाठी बाहेर पडत आहेत. पिकनिक साठी बहुतांशी लोक तीर्थक्षेत्रावर जातात.
यामुळे सध्या राज्यातील अनेक तीर्थक्षेत्रांवर भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. दरम्यान जर तुम्हीही यंदाच्या उन्हाळी सुट्ट्यामध्ये शिर्डी, अक्कलकोट आणि गाणगापूरला दर्शनासाठी जाणार असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे.

ही बातमी अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्यातील भाविकांसाठी अधिक खास ठरणार आहे. कारण की कोपरगाव आगाराने कोपरगाव बस स्थानकावरून शिर्डी, अक्कलकोट आणि गाणगापूर साठी नवीन बस सेवा सुरू केली आहे. या बससेवेमुळे भाविकांना या तिन्ही तीर्थक्षेत्रांवर भेटी देता येणे शक्य होणार आहे.
श्रीक्षेत्र साईनगर शिर्डी, श्री स्वामी समर्थ महाराजांचे अक्कलकोट आणि दत्त महाराजांचे गाणगापूर हे तिन्ही तीर्थक्षेत्रे फारच महत्त्वाची आहेत. येथे राज्यातील आणि राज्याबाहेरील भाविकांची नेहमीच मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळते. दरम्यान हीच बाब विचारात घेऊन या तीर्थक्षेत्रांवर दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी कोपरगाव आगाराने कोपरगाव ते गाणगापूर अशी नवी बस सेवा सुरू केली आहे.
ही बस सेवा कोपरगाव आगारातर्फे सुरू करण्यात आली असून बससेवेची सुरुवात आजपासून अर्थातच 21 एप्रिल 2025 पासून होणार आहे. या बससेवेअंतर्गत कोपरगाव येथून बस रवाना होईल आणि ती बस शिर्डी, अक्कलकोट आणि गाणगापूरला जाणार आहे. आता आपण याच वेळापत्रक पाहणार आहोत.
कस आहे नव्या बससेवेचे वेळापत्रक?
कोपरगाव आगाराकडून प्राप्त माहितीनुसार ही नव्याने सुरू करण्यात आलेली बस कोपरगाव येथून सकाळी साडेसात वाजता रवाना होणार आहे. पुढं ही बस शिर्डी येथून सकाळी 8.00 वाजता निघेल अन गाणगापूरला मार्गस्थ होईल. तसंच परतीच्या प्रवासाबाबत बोलायचं झालं तर ही बस दुसऱ्या दिवशी सकाळी 6.00 वाजता गाणगापूर येथून शिर्डी, कोपरगावच्या दिशेने येणार आहे.
तिकीट दर कसे असणार?
या नव्याने सुरू करण्यात आलेल्या बसच्या तिकीट दराबाबत बोलायचं झालं तर या बस मधून प्रवास करणाऱ्या सामान्य प्रौढ प्रवाशांना 774 रुपये मोजावे लागणार आहेत. त्याचवेळी 60 वर्षांवरील जेष्ठ नागरिकांना या बसमधून प्रवास करण्यासाठी 417 रुपयांचे तिकीट काढावे लागणार आहे. महिलांना देखील तिकीट दरात सवलत दिली जाते यामुळे या बसने महिलांना प्रवास करायचा असेल तर त्यांना सुद्धा ज्येष्ठ नागरिकांप्रमाणेच 417 रुपयांचे तिकीट काढावे लागणार आहे.
महत्वाची बाब अशी की कोपरगाव आगारातर्फे सुरू करण्यात आलेल्या या एसटी बस मधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना शासकीय नियमाप्रमाणं इतर सर्व सवलती लागू करण्यात आल्या आहेत. यामुळे या नव्याने सुरू करण्यात आलेल्या बससेवेला प्रवाशांनी उदंड प्रतिसाद दाखवावा असे आवाहन कोपरगाव आगारा तर्फे करण्यात आले आहे.