Maharashtra Railway : सध्या देशातील रस्ते आणि रेल्वेचे नेटवर्क स्ट्रॉंग बनवले जात आहे. खरे तर कोणत्याही विकसित देशात तेथील दळणवळण व्यवस्था महत्त्वाची भूमिका निभावते. दरम्यान हीच बाब विचारात घेऊन महाराष्ट्रासहित संपूर्ण देशभरातील दळणवळण व्यवस्था सुधारण्यासाठी रस्ते आणि रेल्वेचे विविध प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत.
दरम्यान आता महाराष्ट्रातील अशाच एका महत्त्वाच्या रेल्वे प्रकल्पाच्या बाबत एक महत्त्वाचे अपडेट हाती आले आहे. खरेतर, राज्यात गेल्या काही वर्षांमध्ये अनेक नवनवीन रेल्वे मार्ग विकसित झाले आहेत. तसेच काही भागातील सध्याच्या रेल्वे मार्गांची क्षमता सुद्धा वाढवण्यात आली आहे.

आता उत्तर महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील एक महत्त्वाचा रेल्वेमार्ग ब्रॉडगेज केला जाणार आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, पाचोरा-जामनेर हा मीटरगेज असलेला रेल्वे मार्ग आता ब्रॉडगेज होणार आहे. महत्वाचे म्हणजे रेल्वे मंत्रालयाकडून या प्रकल्पाच्या कामाला आता गती मिळाली आहे.
कारण की या कामासाठी सादर करण्यात आलेल्या विविध कंपन्यांच्या निविदापैकी एका निविदेला मान्यता देण्यात आली आहे. या रेल्वे मार्ग प्रकल्पाच्या कामासाठी 568 कोटी 86 लाखांची अशोका बिल्डकॉन कंपनीची निविदा मंजूर करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे.
यामुळे आता हे काम नियोजित वेळेत पूर्ण होऊ शकते अशी आशा व्यक्त होऊ लागली आहे. या रेल्वे मार्ग बाबत बोलायचं झालं तर हा ब्रिटिश कालीन मार्ग आहे आणि याची लांबी 53 किलोमीटर इतकी आहे. ब्रिटिशकालीन मार्ग असल्याने हा मार्ग नागरिकांमध्ये आकर्षणाचे केंद्र ठरला आहे.
मात्र या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या पाहता या रेल्वेमार्गाचे ब्रॉडगेज लाईनमध्ये रूपांतर झाले पाहिजे अशी मागणी सुद्धा गेल्या काही वर्षांपासून सातत्याने उपस्थित होत होती.
दरम्यान यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून राजकीय स्तरावर मोठ्या प्रमाणात पाठपुरावा सुरू झाला तसेच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी देखील या भागातील नागरिकांच्या हितासाठी हा मार्ग ब्रॉडगेज झाला पाहिजे यासाठी जोरदार पाठपुरावा केला.
दरम्यान आता हा पाठपुरावा यशस्वी झाला असून आता पाचोरा जामनेर रेल्वे मार्ग ब्रॉडगेज करण्याच्या कामाला सुरुवात होणार आहे. या प्रकल्पासाठी सादर झालेली एक निविदा अंतिम करण्यात आली असल्याने आता प्रत्यक्षात याचे सिव्हिल काम सुरू होणार आहे.
अशोका बिल्डकॉन लिमिटेड या कंपनीकडून आता लहान मोठे पूल, अंडर ब्रिज, ओव्हर ब्रीज, रस्ते, यार्ड व यार्डमधील रस्ते ही कामे पूर्ण केली जाणार आहेत. महत्त्वाचे म्हणजे या कंपनीला पुढील तीस महिन्यात हे काम पूर्ण करायचे आहे.
हे काम पूर्ण झाल्यानंतर मग दुसऱ्या टप्प्यात रेल्वे ट्रॅक टाकण्याचे काम तसेच विद्युतीकरण, सिग्नलचे काम सुरू केले जाणार अशी माहिती जाणकार लोकांकडून समोर आली आहे. हा रेल्वे मार्ग जळगाव जिल्ह्याच्या एकात्मिक विकासाला चालना देणारा ठरणार आहे.