Hapus Mango News : उन्हाळा सुरु झाला की आंब्याचा सिझन सुरू होतो. दरवर्षी उन्हाळ्यात आंब्याची मोठी मागणी असते. याही वर्षी बाजारात मोठ्या प्रमाणात आंब्यांची आवक होत असून तेवढीच मागणी सुद्धा आहे. बाजारात हापूसहित विविध जातींच्या आंब्याची मोठ्या प्रमाणात आवक होत आहे.
दरम्यान गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर ज्यांनी अधिकचे पैसे देऊन हापूस आंबे खरेदी केले होते त्यांना अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर हापूस आंब्यासाठी अधिकचा पैसा खर्च करावा लागणार नाही असे दिसते. कारण हापूस आंब्याच्या रेटमध्ये आता मोठ्या प्रमाणात घसरण पाहायला मिळाली आहे.

खरे तर महाराष्ट्रात गुढीपाडव्याला आमरसचा बेत आखला जातो. त्याचप्रमाणे अक्षय तृतीयाच्या दिवशी देखील राज्यात अनेक ठिकाणी आमरसचा बेत असतो. यामुळे नेहमीच अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर आंब्याच्या रेटमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असते.
या वर्षी मात्र परिस्थिती उलट राहणार असे बोलले जात आहे. खरेतर, हापूस आंब्याच्या दरात गेल्या काही दिवसांमध्ये मोठी घसरण झाली आहे. आता आपण सध्या हापूस आंब्याला काय भाव मिळतोय याविषयी माहिती पाहणार आहोत.
सध्या हापूस आंब्याला काय दर मिळतोय ?
सध्या हापूस आंब्याच्या चार ते पाच डझनांच्या पेटीस केवळ दीड ते दोन हजार रुपये इतकाच दर मिळत असल्याची माहिती व्यापाऱ्यांकडून तसेच विक्रेत्यांकडून समोर येत आहे. व्यापाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे, स्थानिक बाजारपेठेत आंब्याची मोठ्या प्रमाणात आवक झाल्यामुळे प्रति डझन दर 300 ते 500 रुपयांपर्यंत खाली आला आहे.
म्हणजेच आवक वाढली असल्याने दर कमी झाले आहेत आणि आगामी काळातही आंब्याची आवक अशीच वाढत राहण्याची शक्यता आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की नेहमीप्रमाणे यंदाही हापूसचा हंगाम जानेवारीच्या अखेरीपासून सुरू झाला मात्र सुरुवातीला हा हंगाम अगदीच धीम्या गतीने सुरू झाला होता.
सुरुवातीला आंब्याचे फारच कमी आवक होत होती. फेब्रुवारीअखेरपर्यंत आवक कमी असल्यामुळे आंब्याच्या पेटीला 6 हजारापासून ते 8 हजार रुपयांपर्यंतचा भाव मिळत होता. मात्र, गेल्या मार्च महिन्यापासून परिस्थिती बदलली आहे.
वाढलेल्या तापमानामुळे आंबा झपाट्याने परिपक्व होऊ लागला आहे आणि म्हणूनच सध्या आंब्याची बाजारात आवक वाढली आहे. या चालू एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आंब्याची मोठ्या प्रमाणात आवक झाली.
यामुळे दरात लक्षणीय घसरण झाली आहे. हंगामाच्या अगदी सुरुवातीलाच 1200 रुपयांना विकला जाणारा आंबा आता केवळ 300 ते 500 रुपयांना उपलब्ध होत आहे. यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
दुसरीकडे जाणकार लोकांनी सध्या बाजारात गोवा मानखुर्द व केसर आंब्याचाही बाजारात प्रवेश झाला असून पूर्व महाराष्ट्रातील काही भागांतील आंबाही परिपक्व होत असल्याने एकूणच दर घसरले असल्याचे निरीक्षण यावेळी नोंदवले आहे.