Grand Vitara 7-Seater : मारुती सुझुकी लवकरच आपल्या ग्राहकांसाठी एक नवे 7-सीटर वाहन घेऊन येत आहे. सध्या ‘ग्रँड विटारा’ या लोकप्रिय एसयूव्हीच्या 7-सीटर आवृत्तीची जोरदार तयारी सुरू आहे. ही कार आधीच अनेक वेळा रस्त्यावर चाचणी करताना दिसली असून तिचे डिझाईन रेंडर्स देखील नुकतेच समोर आले आहेत. त्यामुळे या गाडीबाबतची उत्सुकता आणखीनच वाढली आहे.
ही नवी गाडी कंपनीच्या नेक्सा डीलरशिपमध्ये दाखल होणार असून ती ‘इन्व्हिक्टो’च्या खाली आणि ‘ग्रँड विटारा’च्या वर स्थित असणार आहे. विशेष म्हणजे, ही केवळ ग्रँड विटाराची लांबवलेली आवृत्ती नाही, तर त्यापेक्षा अधिक स्वतंत्र वैशिष्ट्ये असलेली एक वेगळी ओळख असणारी कार असणार आहे. स्पाय शॉट्सच्या आधारे तयार करण्यात आलेले रेंडर हे कारच्या संभाव्य उत्पादन व्हर्जनची झलक दाखवतात.

Grand Vitara 7-Seater चे इंटिरियर-
या गाडीचा साइज फारसा वाढवलेला नसल्याचे दिसून येते, मात्र तिच्या इंटिरियरमध्ये दोन अतिरिक्त जागा असण्याची शक्यता आहे. त्यामुळे कुटुंबासाठी ही एक योग्य पर्याय ठरू शकते. रेंडर्समध्ये नवीन अलॉय व्हील्स, एलईडी डीआरएलसह पारंपरिक हेडलाइट्स, आणि कॉर्नरिंग फंक्शनसह फॉग लॅम्प यांचा समावेश दिसतो. ही डिझाईन विद्यमान 5-सीटर ग्रँड विटाराच्या तुलनेत अधिक स्टायलिश आणि आधुनिक वाटते.
या 7-सीटर व्हर्जनमध्ये लेव्हल-2 ADAS तंत्रज्ञान असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हे तंत्रज्ञान भारतातील कोणत्याही मारुती गाडीत प्रथमच दिसेल. यासाठी आवश्यक असलेला रडार एक मध्यवर्ती ग्रिलमध्ये बसवण्यात आलेला आहे. शिवाय, वरची ग्रिल बंद ठेवण्यात आली असून खालच्या ग्रिलमध्ये पार्किंग सेन्सर्स आहेत.
कुणाशी असणार थेट स्पर्धा?
गाडीमध्ये सिल्व्हर रूफ रेल्स, क्रोम विंडो लाईन, क्रोम डोअर हँडल्स, यूव्ही कट ग्लास आणि कनेक्टेड रिअर एलईडी टेललाइट्स यांसारखी वैशिष्ट्ये ही एक प्रीमियम लुक देतात. इंजिन पर्यायांच्या बाबतीत, यात 1.5 लिटर नैसर्गिक एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन मिळू शकते, जे 5-स्पीड मॅन्युअल किंवा 6-स्पीड टॉर्क कन्व्हर्टरसह जोडलेले असेल. याव्यतिरिक्त, एक 1.5 लिटर हायब्रिड युनिटसुद्धा उपलब्ध असण्याची शक्यता आहे, जे eCVT ट्रान्समिशनसह असेल.
मारुतीची ही नवी 7-सीटर कार बाजारात आल्यानंतर ह्युंदाई अल्काझार आणि किआच्या आगामी एमपीव्हीशी थेट स्पर्धा करेल. मारुतीकडून ही कार लवकरच सादर होण्याची अपेक्षा आहे आणि ती कंपनीच्या पोर्टफोलिओमधील एक महत्त्वाची भर ठरेल.