Ahilyanagar News: अहिल्यानगर – येत्या २९ एप्रिल रोजी चोंडी येथे होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी प्रशासनाने जोरदार तयारी सुरू केली आहे. या बैठकीसाठी भव्य मंडप, स्टेज, ग्रीन रूम्स आणि इतर आवश्यक सुविधा उभारण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने सव्वा कोटी रुपयांची निविदा सोमवारी जाहीर केली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त आयोजित या बैठकीत अहिल्यादेवींच्या स्मारकाच्या विकास आराखड्यासह जिल्ह्यातील विविध प्रस्तावांवर चर्चा होणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासह विविध खात्यांचे मंत्री, सचिव आणि वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. चोंडी हे अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मगाव असून, विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांचेही याच गावाशी नाते आहे. त्यांनी या बैठकीसाठी विशेष प्रयत्न केले आहेत. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रशासनाला तयारीसाठी सूचना देत विविध प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

तात्पुरत्या स्वरूपाची भव्य व्यवस्था
चोंडीत आवश्यक सुविधांचा अभाव असल्याने प्रशासनाला तात्पुरत्या स्वरूपात भव्य व्यवस्था उभारावी लागणार आहे. यामध्ये मुख्य सभामंडप, स्टेज, ग्रीन रूम्स, प्रसाधन गृहे, बॅरिकेड्स, ध्वनियंत्रणा, वातानुकूलन यंत्रणा, जनरेटर, सीसीटीव्ही कॅमेरे आणि अग्निशमन यंत्रणा यांचा समावेश आहे. याशिवाय, रस्ते दुरुस्ती, स्टेशनरी, वाहन व्यवस्था आणि हेलिपॅड उभारणी यांसारख्या कामांवरही खर्च होणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाला ही सर्व कामे तीन दिवसांत पूर्ण करण्याचे आव्हान आहे.
मध्यप्रदेश सरकारच्या धर्तीवर चोंडीत बैठक
या बैठकीचा मुख्य उद्देश अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाच्या विकास आराखड्याला गती देणे आहे. मध्य प्रदेश सरकारने अहिल्यादेवींच्या जयंतीनिमित्त इंदूर येथे मंत्रिमंडळाची बैठक घेतली होती, त्याच धर्तीवर चोंडीत ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. याशिवाय, २०२७ मध्ये नाशिक येथे होणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शनिशिंगणापूर आणि शिर्डीला भेट देणाऱ्या भाविकांसाठी सुविधा निर्माण करण्याबाबतही चर्चा होणार आहे. यामुळे जिल्ह्याला अतिरिक्त निधी उपलब्ध होण्याची शक्यता आहे.
३ दिवसांत सुविधा उभारल्या जाणार
जिल्हाधिकाऱ्यांनी गेल्या आठवड्यात प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश दिले. “मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी सर्व सुविधा तीन दिवसांत उभारल्या जातील. मुख्य मंडप आणि इतर व्यवस्थेसाठी निविदा प्रक्रिया सुरू झाली आहे,” अशी माहिती अहिल्यानगरचे अधीक्षक अभियंता भरतकुमार व्ही. बाविस्कर यांनी दिली. या बैठकीमुळे चोंडी आणि परिसराच्या विकासाला चालना मिळण्याची अपेक्षा आहे.