अहिल्यानगर : लष्कराच्या हद्दीतील विविध नागरी समस्या तसेच बेलेश्वर व खोपेश्वर मंदिराच्या विकासासंदर्भात खा. नीलेश लंके यांच्या अध्यक्षतेखाली स्टेशन हेडक्वार्टर येथे बैठक पार पडली. या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात येऊन खा. लंके यांनी अधिकाऱ्यांना त्वरीत कारवाईचे निर्देश दिले.
लष्करी हद्दीतील बांधकामासाठीच्या ना हरकत प्रमाणपत्रासंदर्भात १० मिटर मर्यादेसाठी तातडीने रक्षा मंत्रालयाकडे प्रस्ताव सादर करण्याच्या सुचना खा. लंके यांनी दिल्या. वाकोडी, दरेवाडी, निंबोडी या गावातील नागरिकांना घरबांधणीसाठी लागणाऱ्या ना हरकत प्रमाणपत्रासंदर्भात रक्षा मंत्रालयाच्या सन २०११ व २०१६ च्या मार्गदर्शक सुचनांचा आधार घेत १०० ऐवजी १० मिटर मर्यादेस परवानगी मिळावी यासाठी स्पष्टीकरण मागविण्यासंदर्भात प्रस्ताव पाठविण्याच्या सुचना खा. लंके यांनी दिल्या असून या निर्णयामुळे अनेक गरजू नागरिकांना दिलासा मिळणार आहे.

नगर येथील बेलेश्वर व विळद येथील खोपेश्वर मंदिरासाठी सुशोभिकरण व वीज पुरवठयासंदर्भातील प्रस्तावास लष्करी प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून सीमारेषा निश्चित करून अधिकृत परवानगी घेण्यासंदर्भात खा. लंके यांनी या बैठकीत सुतोवाच केले.
नगर क्लब समोरील रस्त्याच्या दुरूस्तीसाठी या बैठकीत परवानगी देण्यात आली. या रस्त्यासाठी १५ लाख रूपयांचा निधी देण्याची ग्वाही खा. लंके यांनी दिली असून हे काम लवकरच सुरू होणार आहे.
या बैठकीस स्टेशन कमांडर ब्रिगेडियर रिझोल डिसोझा, एडमिन कमांडर समीर सरदाना, स्टेशन स्टॉक ऑफिसर ले. कर्नल माने, स्टाफ ऑफिसर ले कर्नल संजय दिक्षीत, भिंगार कॅन्टोन्मेंटचे मुख्याधिकारी विक्रांत मोरे व इतर लष्करी अधिकारी उपस्थित होते.अधिकाऱ्यांव्यतिरिक्त नगर क्लबचे अध्यक्ष अशोक पितळे, मा. नगरसेवक मुदस्सर शेख, गणेश तोडमल, सचिन कराळे, प्रवीण वारूळे, गणेश रोडे ॲड. विनोद गवळी यांच्यासह वाकोडी, दरेवाडी, निंबोडी येथील ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.
बॉम्ब निकामी करा
गेल्या आठवडयात राहुरी कृषि विद्यापीठाच्या परिसरात फायटर जेटमधून पडलेला जिवंत बॉम्ब जमिनीमध्ये सुमारे सात फुट खोलवर अडकलेला आहे. तो नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण करणारा असल्याने तो तातडीने निकामी करण्याच्या सुचना खा. लंके यांनी दिल्या.
शैक्षणिक व अत्यावश्यक
गरजांसाठी रस्ते खुले करा लष्करी हद्दीतील अनेक रस्ते पूव नागरीकांसाठी खुले होते. मात्र अलिकडच्या काळात हे रस्ते बंद करण्यात आले आहेत. रस्ते बंद करण्यात आल्याने शाळकरी मुलांना त्रास सहन करावा लागतो. हे रस्ते किमान शैक्षणिक व अत्यावश्यक गरजांसाठी खुले करावेत अशी मागणी खा. लंके यांनी यावेळी केली. दरेवाडी हरीमळा रस्ता ग्रामपंचायतीच्या हद्दीत असून तो नागरिकांसाठी खुला करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले.