अहिल्यानगरमध्ये व्हीआयपी नंबर वापरणाऱ्या महागड्या गाड्यांवर कोट्यावधी रुपयांचा दंड थकला, दंड भरण्यास गाडी मालकांची टाळाटाळ!

Published on -

Ahilyanagar News: अहिल्यानगर- वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर वाहतूक पोलिसांकडून दंडात्मक कारवाई केली जाते. विशेष म्हणजे, व्हीआयपी नंबर असलेली महागडी वाहनेही याला अपवाद नाहीत. मात्र, या व्हीआयपी वाहनचालकांकडून दंड भरण्यास टाळाटाळ होत असल्याने वसुलीचे प्रमाण अत्यंत कमी आहे. गेल्या वर्षभरात तब्बल ८ कोटी रुपयांचा दंड थकीत आहे, तर केवळ १५ हजार वाहनचालकांनीच दंडाची रक्कम भरली आहे.

पूर्वी वाहतूक नियमांचे उल्लंघन झाल्यास पोलिसांकडून जागेवर पावती देऊन दंड वसूल केला जायचा, ज्यामुळे वसुली प्रभावी होती. आता मात्र, ऑनलाइन दंड प्रणाली लागू झाल्याने पोलिस वाहनांचे फोटो काढून दंड आकारतात आणि संबंधित माहिती वाहनचालकांच्या मोबाइलवर मेसेजद्वारे पाठवली जाते.

१ कोटी ८० हजारांचा दंड वसूल

ऑनलाइन पद्धतीने दंड भरण्याची सुविधा उपलब्ध असूनही, अनेक वाहनचालक, विशेषतः महागडी वाहने वापरणारे, दंड भरण्यास टाळाटाळ करतात. गेल्या वर्षी वाहतूक शाखेने १ लाख १३ हजार ३३५ वाहनांवर ९ कोटी ३३ लाख ९२ हजार रुपयांचा दंड आकारला. यापैकी फक्त १५ हजार ७१७ वाहनचालकांनी १ कोटी ८० हजारांचा दंड भरला, तर ९७ हजार ६१० वाहनचालकांनी ८ कोटी २५ लाखांचा दंड थकवला आहे.

दंड भरण्यास टाळाटाळ

ऑनलाइन दंड प्रणालीमुळे वाहनचालकांना दंडाची माहिती तात्काळ मिळते, परंतु त्याची रक्कम भरण्यासाठी पुढाकार घेतला जात नाही. व्हीआयपी नंबर असलेली वाहने वापरणारेही दंड भरण्यास उदासीन असल्याने थकीत रक्कम वर्षानुवर्षे वाढत आहे. वाहतूक शाखेकडून नियमितपणे कारवाई केली जाते, परंतु दंडाची वसुली होत नसल्याने प्रशासकीय आव्हान निर्माण झाले आहे. काही वाहनचालक ऑनलाइन दंड भरतात, परंतु मोठ्या संख्येने वाहनचालक, विशेषतः उच्चभ्रू वर्ग, याकडे दुर्लक्ष करतात.

८ कोटी रुपयांचा दंड थकीत

जिल्ह्यात सध्या २७ हजार ६१० वाहनमालकांकडे ८ कोटी २५ लाख ८४ हजार रुपयांचा दंड थकीत आहे. यंदाच्या वर्षीच्या थकीत दंडाची भर पडल्याने ही रक्कम आणखी वाढली आहे. वाहतूक पोलिसांसमोर आता या कोट्यवधींच्या थकीत दंडाची वसुली कशी करायची, हा मोठा प्रश्न आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News