पाथर्डी: दुष्काळाच्या झळांनी होरपळलेल्या पाथर्डी तालुक्यात जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर शेतकऱ्यांनी शेतीला नवे यश मिळवून दिले आहे. याच प्रेरणादायी प्रवासाची कहाणी आहे भोसे (ता. पाथर्डी) येथील शेतकरी आप्पासाहेब शिंदे आणि त्यांचा मुलगा विजय शिंदे यांची.
त्यांनी चार एकर शेतात संत्र्याची १,५०० झाडे लावून यंदा ७७.६५ लाख रुपयांचे विक्रमी उत्पन्न मिळवले आहे. तालुक्यात संत्रा, डाळिंब, मोसंबी आणि सीताफळ यांसारख्या फळबागांचे उत्पादन वाढत असताना, शिंदे कुटुंबाने आपल्या कष्टाने आणि नियोजनबद्ध शेतीने सर्वांसमोर आदर्श ठेवला आहे.

सेंद्रिय खतांचा वापर आणि जैविक शेती पद्धत
आप्पासाहेब आणि विजय शिंदे यांनी चार एकर क्षेत्रावर ठिबक सिंचन तंत्राचा वापर करून संत्र्याची १,५०० झाडे लावली. सेंद्रिय खतांचा वापर आणि जैविक शेती पद्धतींचा अवलंब करत त्यांनी झाडांची काळजीपूर्वक जोपासना केली. यंदा त्यापैकी १,२५० झाडांना उत्कृष्ट फळधारणा झाली. त्यांच्या संत्र्यांना पुणे बाजारपेठेत उत्कृष्ट रंग, चव आणि टिकाऊपणामुळे प्रचंड मागणी मिळाली. सरासरी २२५ रुपये प्रति किलो दराने त्यांच्या मालाला पुण्यातील व्यापारी युवराज काची, कुणाल काची, अरविंद सूर्यवंशी, अकलेश बनसोडे, नितीन टेमके, महादेव राठोड आणि किरण सूर्यवंशी यांनी प्राधान्य दिले.
योग्य नियोजन
या यशस्वी कामगिरीबद्दल शिंदे कुटुंबाचा पुणे मार्केट कमिटीमध्ये शनिवारी (१९ एप्रिल २०२५) सत्कार करण्यात आला. विजय शिंदे यांनी सांगितले की, शेती कठीण नाही, परंतु त्यासाठी वेळ, नियोजन आणि मेहनत आवश्यक आहे. कमी पाणी आणि मर्यादित क्षेत्रातही योग्य पद्धतीने शेती केल्यास मोठे उत्पन्न मिळू शकते. या यशात त्यांच्या आई कलावती शिंदे आणि भाऊ अमोल शिंदे यांचा मोलाचा वाटा आहे, असे त्यांनी आवर्जून नमूद केले. शिंदे कुटुंबाने सेंद्रिय शेती आणि तंत्रज्ञानाचा वापर करून दुष्काळी परिस्थितीतही शेतीतून लाखोंचे उत्पन्न कसे मिळवता येते, याचा आदर्श घालून दिला आहे.
अनेक शेतकऱ्यांची बागेला भेट
शिंदे यांच्या यशाने तालुक्यातील इतर शेतकऱ्यांनाही प्रेरणा मिळाली आहे. भोसे, वैजूबाभळगाव, करंजी, दगडवाडी, लोहसर, खांडगाव, घाटशिरस, जोडमोहोज आणि सातवड येथील शेतकरी त्यांच्या संत्रा बागेला भेट देऊन मार्गदर्शन घेत आहेत. संत्रा, डाळिंब, मोसंबी आणि सीताफळ यांसारख्या फळबागांसाठी त्यांचा सल्ला मौल्यवान ठरत आहे. तालुक्यात यंदा अनेक शेतकऱ्यांनी फळबागांमधून चांगले उत्पन्न मिळवले असले, तरी शिंदे कुटुंबाने मिळवलेले ७७ लाखांचे उत्पन्न हा सर्वांसाठी प्रेरणादायी टप्पा ठरला आहे. त्यांच्या या यशामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये नव्या आशा पल्लवित झाल्या असून, शिंदे कुटुंबाचे सर्वत्र कौतुक होत आहे.