अहिल्यानगर : भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) अंतर्गत निवडणुका गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात सुरू आहेत. अहिल्यानगर शहरातील चार मंडलांच्या अध्यक्षपदाच्या निवडी अंतर्गत गटबाजीमुळे रखडल्या होत्या. मात्र, पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी हस्तक्षेप करत अखेर मध्य शहर, सावेडी, भिंगार आणि केडगाव मंडलाध्यक्षपदाच्या निवडी जाहीर केल्या.
यामुळे पक्षातील अंतर्गंत राजकारणाला पूर्णविराम मिळाला आहे. मयूर बोचूघोळ (मध्य शहर), सीए ज्ञानेश्वर उर्फ राजेंद्र काळे (सावेडी), सचिन जाधव (भिंगार) आणि भरत ठुबे (केडगाव) यांना मंडलाध्यक्षपदी संधी देण्यात आली आहे.

अंतर्गंत गटबाजीमुळे लांबल्या होत्या निवडी
भाजपच्या अंतर्गत निवडणुका राज्यभरात शहरी आणि ग्रामीण अशा दोन्ही स्तरांवर घेतल्या जात आहेत. ग्रामीण भागातील निवडणुका यापूर्वीच पूर्ण झाल्या असून, तालुकाध्यक्षांच्या निवडी जाहीर झाल्या आहेत. काही तालुक्यांमध्ये प्रत्येकी दोन तालुकाध्यक्ष नियुक्त करण्यात आले आहेत. मात्र, या निवडींवरून काही ठिकाणी नाराजी व्यक्त झाली, आणि कार्यकर्त्यांनी वरिष्ठ नेत्यांकडे तक्रारी केल्या. पक्षश्रेष्ठी सध्या या नाराज कार्यकर्त्यांची समजूत काढण्यात व्यस्त आहेत. दुसरीकडे, अहिल्यानगर शहरात मंडलाध्यक्षांच्या निवडी तांत्रिक कारणांमुळे आणि अंतर्गत गटबाजीमुळे लांबल्या होत्या. पक्षातील गटबाजीमुळे निवड प्रक्रिया रखडल्याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये होती.
वरिष्ठांच्या हस्तक्षेपाने निवड जाहीर
मंडलाध्यक्षपदासाठी पक्षाने १८ निकष निश्चित केले होते. यामध्ये उमेदवार हा पक्षाचा सक्रिय कार्यकर्ता असावा, पक्षाच्या संघटनात्मक उपक्रमांमध्ये त्याचा सहभाग असावा, आणि पक्षाशी निष्ठा असावी, अशा बाबींचा समावेश होता. अहिल्यानगर शहरात मंडलाध्यक्ष निवडीवरून बराच काळ गटबाजी आणि चर्चा सुरू होत्या. अखेर पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी हस्तक्षेप करत चारही मंडलांचे अध्यक्ष जाहीर केले. मध्य शहरासाठी मयूर बोचूघोळ, सावेडीसाठी सीए ज्ञानेश्वर उर्फ राजेंद्र काळे, भिंगारसाठी सचिन जाधव आणि केडगावसाठी भरत ठुबे यांची निवड झाली.
शहरातील मंडलाध्यक्षपदाचा तिढा सुटला
या निवडींमुळे अहिल्यानगर शहरातील मंडलाध्यक्षपदाचा तिढा सुटला असून, आता जिल्हाध्यक्ष आणि शहराध्यक्ष निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे. ग्रामीण भागातील तालुकाध्यक्ष आणि मंडलाध्यक्षांच्या निवडी पूर्ण झाल्याने पक्ष आता पुढील टप्प्यातील निवडींवर लक्ष केंद्रित करत आहे. जिल्हाध्यक्ष आणि शहराध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार, याकडे कार्यकर्त्यांचे आणि राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले आहे.