SSC-HSC Result 2025 : महाराष्ट्रातील लाखो दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून यंदाच्या परीक्षांचे उत्तरपत्रिका तपासणीचे काम जवळपास पूर्ण झाले असून, निकाल मे महिन्यातच जाहीर होणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. यामुळे विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक प्रवेशासाठी अधिक वेळ मिळणार आहे.
उत्तरपत्रिका तपासणीचे काम पूर्ण –
यंदा बारावीची परीक्षा 11 फेब्रुवारीपासून 18 मार्चदरम्यान पार पडली होती. तर दहावीची परीक्षा 21 फेब्रुवारीपासून घेण्यात आली होती. परीक्षांचा कालावधी संपल्यानंतर लगेचच उत्तरपत्रिका तपासणी सुरू करण्यात आली. छत्रपती संभाजीनगर, पुणे, नागपूर, कोल्हापूर, लातूर, कोकण, नाशिक, अमरावती आणि मुंबई या विभागांतील उत्तरपत्रिका तपासणीचे काम वेळेत पूर्ण करण्यात आले आहे. तपासलेले पेपर शिक्षण मंडळाकडे 8 एप्रिलपूर्वीच जमा करण्यात आले आहेत.

बारावीच्या उत्तरपत्रिकांचे मुल्यमापन दोन आठवड्यांपूर्वीच पूर्ण झाले होते. त्यानंतर दहावीच्या पेपर तपासणीचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले होते. यंदा उत्तरपत्रिका वेळेत तपासल्या गेल्याने निकालही अपेक्षेपेक्षा लवकर लागणार आहे. मंडळाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, बारावीचा निकाल मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात म्हणजे अंदाजे 15 मेच्या आसपास जाहीर होण्याची शक्यता आहे. तर दहावीचा निकाल 17 किंवा 18 मे रोजी लागण्याची शक्यता आहे.
मे महिन्यात निकाल?
2025 मध्ये परीक्षा वेळेपूर्वी घेण्यात आल्यामुळे निकालही लवकर जाहीर होणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वर्षासाठी लागणाऱ्या प्रवेश प्रक्रियेसाठी भरपूर वेळ मिळेल. जूनपासून उच्च माध्यमिक, महाविद्यालयीन व विविध अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सुरू होणार असल्याने निकाल वेळेत लागणे अत्यावश्यक होते.
राज्यातील शैक्षणिक मंडळाने यंदा वेळेत नियोजन करत उत्तरपत्रिका तपासणीच्या कामावर विशेष लक्ष दिले. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये आणि प्रवेश प्रक्रियेस विलंब होऊ नये यासाठी अधिकाऱ्यांकडून सतत पाठपुरावा करण्यात आला. त्यामुळे यंदा वेळेत निकाल प्रक्रिया पार पडणार आहे.