Ahilyanagar News: अहिल्यानगर- श्रीरामपूरमधील भारतीय जनता पक्षात (भाजपा) नव्या आणि जुन्या कार्यकर्त्यांमधील वाद चिघळला असून, नियमबाह्य आणि एकतर्फी पद्धतीने शहर व तालुकाध्यक्ष निवडी झाल्याचा आरोप जुन्या निष्ठावंतांनी केला आहे. या अंतर्गत धूसफुशीमुळे पक्षांतर्गत गटबाजी उफाळली असून, बॅनरबाजीच्या माध्यमातून हा वाद थेट प्रदेशाध्यक्षांच्या दालनापर्यंत पोहोचला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, या निवडी रद्द होण्याची शक्यता आहे. पक्षाच्या प्रदेश नेतृत्वाचा निर्णय काय असेल, याकडे श्रीरामपूरमधील कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.
निष्ठावंतांचा आरोप
श्रीरामपूरमधील भाजपा सध्या तीन ते चार गटांमध्ये विभागली गेली आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर जुन्या आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांना सातत्याने डावलण्यात आल्याची भावना पक्षात आहे. नव्याने पक्षात प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांना प्राधान्य दिले जात असल्याचा आरोप निष्ठावंतांनी केला आहे. या अन्यायाविरोधात जुन्या कार्यकर्त्यांनी थेट प्रदेशाध्यक्षांशी संपर्क साधला आणि पक्षातील आपले पुनर्वसन कधी होणार, असा प्रश्न उपस्थित केला. या बैठकीत त्यांनी नवीन पदाधिकारी निवडींमधील अनियमितता आणि पक्षाच्या नियमांचे उल्लंघन याबाबत तक्रारी मांडल्या.

निवडीमुळे अंतर्गत वाद
या वादाला कारण ठरलेल्या शहराध्यक्ष आणि तालुकाध्यक्ष निवडींनी पक्षातील अंतर्गत तणाव उघड केला आहे. पक्ष निरीक्षकांच्या उपस्थितीत या पदांसाठी मुलाखती घेण्यात आल्या होत्या, ज्यात शहराध्यक्षपदासाठी १४ आणि तालुकाध्यक्षपदासाठी १८ उमेदवारांनी सहभाग घेतला होता. प्रकाश चित्ते आणि माजी तालुकाध्यक्ष दीपक पटारे यांनी आपल्या समर्थकांसह शक्तिप्रदर्शन केले. पक्षाने किमान ५० नवीन सदस्य नोंदणी आणि ४५ वर्षांखालील उमेदवारांना प्राधान्य देण्याचे संकेत दिले होते. मात्र, शहराध्यक्षपदी जितेंद्र छाजेड आणि तालुकाध्यक्षपदी बाबासाहेब चेडे यांची निवड जाहीर झाल्याने अनेकांना धक्का बसला. विशेष म्हणजे, या निवडीनंतर दुसऱ्याच दिवशी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा श्रीरामपूर दौरा झाला, ज्यामुळे या निवडींना राजकीय रंग आल्याची चर्चा आहे.
शहरात बँनरबाजी
जुन्या कार्यकर्त्यांनी या निवडींवर तीव्र आक्षेप घेतले असून, त्या नियमबाह्य आणि पक्षाच्या तत्त्वांविरुद्ध असल्याचा दावा केला आहे. काही ठिकाणी उपरोधिक बॅनरबाजीही झाली, ज्यामध्ये “फॉर्च्यूनर गाडी, पैसा आणि काँग्रेसचा डीएनए असेल तरच भाजपात पद मिळेल” असे टोमणे मारण्यात आले. यातून नव्या आणि जुन्या कार्यकर्त्यांमधील (विशेषतः विखे गट) तणाव स्पष्ट झाला. प्रकाश चित्ते यांचे पूर्वी पक्षविरोधी कामामुळे निलंबन झाले होते, परंतु त्यांनी प्रामाणिकपणे पक्षाचे काम सुरू ठेवले.
निवडी रद्द होणार
प्रदेशाध्यक्षांनी या निवडी रद्द करण्याचे संकेत दिले असून, जर निवडलेल्या उमेदवारांवर कोणतेही गुन्हे दाखल असतील तर त्यांना पदांवरून हटवले जाईल, असे आश्वासन दिले आहे. या निर्णयामुळे श्रीरामपूरमधील भाजपातील गटबाजी आणि नेतृत्वाच्या विश्वासार्हतेवर परिणाम होण्याची शक्यता आहे.