ओंकारच्या यशाने निंबळक मध्ये आनंदोत्सव…! तरुणांना प्रेरणादायी यश : मेहेत्रे

Published on -

अहिल्यानगर :घरची आर्थिक परिस्थिती बेताची असताना केवळ जिद्द व चिकाटीने सातत्यपूर्ण प्रयत्न केल्याने यूपीएससी परीक्षेत ओंकार खुंटाळे याने यश मिळविले आहे. जिल्हा परिषदेच्या शाळेत व ग्रामीण भागात प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेऊन देखील भरीव यश संपादन करता येते, हे त्याने दाखवून दिले आहे. त्याचे हे यश तरुणांना प्रेरणा देणारे आहे, असे मत एकात्मिक बाल विकास सेवा योजना नगर प्रकल्पाचे प्रकल्पाधिकारी दीपक मेहेत्रे यांनी व्यक्त केले.

तालुक्यातील निंबळक येथील ओंकार मीनाक्षी राजेंद्र खुंटाळे याने यूपीएससी परीक्षेत ६७३ वा क्रमांक मिळवला. त्याप्रित्यर्थ गावकऱ्यांनी भव्य स्वागत मिरवणूक आणि नागरी सत्कार सोहळ्याचे आयोजन केले होते. याप्रसंगी ते बोलत होते. सेवानिवृत्त नायब तहसीलदार बाबुराव कोतकर अध्यक्षस्थानी होते.

यावेळी सरपंच प्रियंका लामखडे, माजी सभापती डॉ. दिलीप पवार, युवानचे संदीप कुसाळकर, सचिन चोभे, राजेंद्र कोतकर, चेअरमन भाऊराव गायकवाड, ज्येष्ठ नेते माधवराव कोतकर, घोटण देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष शिवाजी गोसावी आदी मान्यवरांसह ग्रामस्थ, तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मान्यवरांची मनोगते झाली.

गावकऱ्यांनी भव्य अशी मिरवणूक, फटाक्यांची आतिषबाजी, गुलालाची उधळण करून ओंकारच्या यशाचा आनंदोत्सव साजरा केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भानुदास कोतकर यांनी केले तर सूत्रसंचालन सुनील जाजगे यांनी केले. महादेव गवळी यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी ज्ञानेश्वर डहाळे, अविनाश व्यवहारे, कमलेश कोळपकर, सचिन औटी यासह निंबळक ग्रामस्थांनी प्रयत्न केले.

हा अविस्मरणीय क्षण : ओंकार खुंटाळे

गेल्या सात वर्षांपासून मी स्पर्धा परीक्षेची तयारी करत होतो. अनेकदा यशाने हुलकावणी दिली. मागच्या प्रयत्नात अगदी थोड्या फरकाने माझ्या पदरी अपयश आले होते. मात्र, हे अपयश अंतिम नाही, असे स्वतःला सांगून, अगदी कमी वेळेत पुढील परीक्षेची तयारी केली. अंतिमतः यावेळी यश मिळाले. माझ्या जन्मभूमीत झालेले स्वागत आणि सत्कार हा माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण असणार आहे, असे सत्काराला उत्तर देताना ओंकार खुंटाळे म्हणाले.

ओंकारची आई मीनाक्षी या अंगणवाडी सेविका म्हणून कार्यरत आहेत. वृत्तपत्रातून बातमी समजताच सत्कार सोहळ्यासाठी एकात्मिक बाल विकास सेवा योजना नगर प्रकल्पाचे प्रकल्पाधिकारी दीपक मेहेत्रे आवर्जून उपस्थित राहिले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe